Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारताच्या 8 माजी नौसैनिकांना (Former Indian Navy Officials) कतार न्यायालयाने (Qatar Court) फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतार सरकारने गेल्या एक वर्षापासून या भारतीयांना कैदेत ठेवले होते. कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (26 ऑक्टोबर) हेरगिरी प्रकरणात या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs- MEA) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो असून आम्ही सविस्तर निर्णयाच्या प्रतीची वाट पाहत आहोत. कतारी न्यायालयाच्या निर्णयावर भारत सरकारने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या निर्णयाला आव्हान देणार असल्याचेही भारताने म्हटले आहे.

यापूर्वी भारताने कतार सरकारला माजी भारतीय नौसैनिकांवर दया दाखवून त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले होते. हे भारतीय इस्रायलसाठी हेरगिरी करत होते, असा कतारचा दावा आहे.

भारत सरकार या माजी नौसैनिकांच्या सुटकेसाठी कायदेशीर पावले उचलत होते. या माजी भारतीय खलाशांनी एकेकाळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर काम केले आहे. सध्या ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या ओमानी नागरिकाच्या मालकीच्या सुरक्षा कंपनीत काम करत होते. त्यांचा दयेचा अर्ज आतापर्यंत अनेकदा फेटाळण्यात आला होता. (हेही वाचा: Bihar Shocker: जत्रेत मारामारी झाल्याने घरात घुसून केला गोळीबार, घटनेत महिलेसह चार जण जखमी)

कतारी न्यायालयाने दिलेला हा असा पहिलाच निर्णय आहे. कतारमध्ये या संपूर्ण घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका भारतीय पत्रकारालाही कतारच्या अधिकाऱ्यांनी तेथून जाण्यास सांगितले होते. तत्पूर्वी, कतारमधील भारतीय राजदूत आणि त्यांचे उपनियुक्त यांनी 1 ऑक्टोबर रोजी तुरुंगात या माजी नौसैनिकांची भेट घेतली होती. कतारने कधीही या भारतीयांवर केलेल्या आरोपांचा तपशील दिलेला नाही. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘आम्ही या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत. आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत.’