BJP MLA Surendra Singh (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जगात हाहाकार माजला आहे. भारतातही या साथीविरुद्ध मोठी लढाई सुरु आहे. मात्र अद्याप या विषाणूवर कोणतेही ठोस उपचार आढळले नाहीत. देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचे काम सुरू आहे. भारतामध्ये उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. योगी सरकार यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, बलिया (Ballia) येथील भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांनी कोरोनाविरूद्ध बचाव करण्याचा एक विचित्र सल्ला लोकांना दिला आहे. एक व्हिडिओ प्रसिद्ध करत, ते म्हणाले आहेत की कोविडवर मात करण्यासाठी लोकांनी गोमूत्र (Cow Urine) प्यावे.

सुरेंद्रसिंग यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ बनविला, ज्यामध्ये ते जनतेला गो-मूत्र पिण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी सांगितले की, दररोज सकाळी रिकाम्या पोटी ब्रश केल्यानंतर, थंड पाण्यात 5 चमचे गो-मूत्र मिसळून पिण्यामुळे कोरोना होणार नाही. गोमूत्र पिल्यानंतर अर्धा तास काहीही न खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. आमदारांनी सांगितले की, ते स्वत: दररोज गोमूत्र पितात. यामुळेच त्यांना अजूनतरी कोरोना झाला नाही. ते म्हणाले की, कोरोनामध्ये बहुतेक लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरत आहेत, परंतु गोमूत्र प्यायल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.

ते पुढे म्हणाले की, हे एक सुपरपॉवर औषध आहे. हे सर्व रोगांवर प्रभावी आहे. त्यांनी जनतेलाही हा उपाय अंमलात आणण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की कोरोना साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा सर्वात मोठा प्रभावी उपाय आहे. (हेही वाचा: नाकात लिंबूचा रस घातल्यावर 5 सेकंदामध्ये बरा होईल Covid-19 चा संसर्ग? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य)

सध्या कोराना विषाणूबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. यासाठी अनेक लोकांनी विविधांगी उपाय करण्याचा सल्ला दिला आहे. आता उत्तर प्रदेशच्या बलियामधील भाजपचे नेते सुरेंद्र यांनी कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी गोमुत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.