कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे गेल्या वर्षापासून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम (Work From Home) करण्याची मुभा दिली आहे. देशावर अजूनही कोरोनाचे सावट असून, सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. आता वकील आणि अनेक उद्योग अधिकारी यांच्या मते देशातील बर्याच कंपन्यांना पुढील 3-4 महिन्यांत त्यांची कार्यालये सुरू करायची आहेत. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत कंपन्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी इंसेंटिव्ह, कमिशन व पगारवाढीला त्याच्याशी जोडत आहेत.
कंपन्या आपल्या कर्मचार्यांना जबरदस्तीने लस देऊ शकत नाहीत, त्यामुळे यासाठी इतर मार्गाने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांच्याबाबत कंपन्या थोड्या कठोर होत आहेत. खेतान अँड कंपनीचे भागीदार अंशुल प्रकाश म्हणतात की, ज्यांनी लस घेतली नाही असे लोक एक मोठ्या लोकसंख्येला संकटात टाकत आहेत. म्हणूनच आता कंपन्या हे स्पष्ट करत आहेत की, लस न घेतल्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीवर होऊ शकतो.
एका इंडस्ट्रियल फर्मच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी आपल्या कर्मचार्यांना लस घेण्यास सांगितले आहे आणि जे लोक लस घेणार नाहीत त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले की, असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे लस न घेण्याचे योग्य कारणदेखील नाही. मात्र अशा लोकांना सांगण्यात आले आहे की त्यांचे वेतन 5% रोखले जाईल. ज्या दिवशी कर्मचारी लस घेतली तेव्हाच त्यांना हे पैसे मिळतील.
(हेही वाचा: बँकींग क्षेत्रासह दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्ये 1 जुलै पासून झाले 'हे' मोठे बदल; वाचा सविस्तर)
कंपन्या अशी सक्ती करत आहे कारण एकदा कार्यालय सुरू झाल्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. तर अशाप्रकारे तुम्हीही घरून काम करत असाल तर लवकरात लवकर लस घ्या कारण कदाचित तुमची कंपनीही असा एखादा नियम लागू करू शकते.