Indian Railway | Photo Credits : PTI

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 47 वर पोहचला आहे. तर भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 160 च्या पार गेली आहे. याच कारणास्तव नागरिकांना वारंवार काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे सुद्धा नागरिकांना सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुद्धा स्वच्छता केली जात आहे. परंतु गर्दीची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून भारतीय रेल्वेकडून 166 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे भारतीय रेल्वेने उद्यापासून (20 मार्च) ते 31 मार्च पर्यंत विविध ठिकाणच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील बर्‍याच शहरांमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मंगळवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता, मध्य रेल्वेने अनेक गाड्याही रद्द केल्या आहेत. महाराष्ट्रात येणार्‍या रद्द केलेल्या गाड्यांची संख्या 23 आहे. त्यातील काही मार्च अखेरपर्यंत तर काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.(COVID-19: मुंबईत 2 महिलांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह, राज्यात रुग्णांचा आकडा 47 वर पोहचला)

मध्य रेल्वेने काही कालावधीकरिता गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, निझामाबाद एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, मनमाड एक्सप्रेस अशा महत्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या 10 गाड्यांच्या 35 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे हमसफर एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेसचा समावेश आहे.