Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहेत.तसेच मुंबई महापालिकेकडून सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी केली आहे. तर सरकारकडून कोरोना व्हायरसबाबत विविध उपाय योजना केल्या आहेत. तरीही कोरोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताज्या अपडेटनुसार,  मुंबईतील 2 महिलांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 वर पोहचली आहे.

एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 22 वर्षीय महिलेची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही सदर महिला युके येथून भारतात आली आहे. तसेच उल्हासनगर येथील अजून एका 49 वर्षीय महिलेची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला दुबई येथून परतल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. तसेच मुंबईतील विलगीकरण कक्षात सुद्धा वाढ करण्यात येत आहे.(मुंबई: Coronavirus च्या भीतीने दादर, माटुंगा, माहीम, धारावी येथे एक दिवस आड सुरु राहणार दुकाने; गर्दी रोखण्यासाठी BMC चा नवा उपाय)

सरकारतर्फे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा- कॉलेज, हॉटेल्स, बार, मॉल्स, मंदिरे, पर्यटन स्थळे सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. त्याचसोबत मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन देण्यासोबत परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचा नियम लागू केला आहे. भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा आकडा 160 च्या पार गेला आहे. यापैकी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.