Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जीव गमावलेल्यांचा आकडा आता 100 च्या पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइट नुसार सद्य घडीला भारतात एकूण 109  कोरोनाचे बळी गेले आहेत तर मागील 12 तासात कोरोनाची 409 प्रकरणे समोर  आली आहेत त्यानुसार देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 4067 वर पोहचली आहे, यापैकी 3666 प्रकरणे पॉझिटिव्ह असून यातील 291 जणांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुरवातीच्या काळात भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 1000 पर्यंत पोहचण्यासाठी अधिक कालावधी लागला होता पण त्यांनतर कोरोनाच्या संकटाने वेग धरत अवघ्या आठवड्याहून कमी कालावधीत आता 4000 चा टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले असून त्यांचाच आकडा हा सध्या 748 च्या घरात आहे. Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे देशातील 274 जिल्हे संक्रमित; तबलीगी जमात कार्यक्रमामुळे रुग्णांमध्ये वाढ

कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी पाहायला गेल्यास, महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश याठिकाणी बहुतांश रुग्ण आढळून आले आहेत. तर सुदैवाने अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि झारखंड मध्ये कोरोना अद्याप अधिक पसरलेला नाही. जर का कोरोना आजारातून रिकव्हर होणाऱ्यांची संख्या पाहिली तर हे आकडे सुद्धा आश्वासक आहेत मात्र जितक्या वेगाने कोरोना पसरतोय तितक्या वेगाने ही रिकव्हरी होत नसल्याने अधिक चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता मृतांचा आकडा वाढल्याने नागरिकांमध्ये भीती दिसून येत आहे.

PTI ट्विट

दरम्यान, मृत रुग्णांमध्ये वयोवृद्ध आणि अन्य आजारांनी त्रस्त नागरिकांचा अधिक समावेश आहे. हायपरटेन्शन, मधुमेह, रक्तदाब असे आजार या मृतांमध्ये असल्याचे कॉमन दिसून आले आहे. त्यामुळे सरकारकडून वारंवार वृद्ध व आजारी व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनावरील उपचारासाठी देशात अनेक हॉस्पिटल राखीव ठेवण्यात आली आहेत, तसेच व्हेंटिलेटर, मास्क अशा सोयी सुद्धा निर्माण केल्या जात आहेत. मात्र अजूनही कोरोनावरील नेमक्या लसीचे संशोधन झालेले नाही.