Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे देशातील 274 जिल्हे संक्रमित; तबलीगी जमात कार्यक्रमामुळे रुग्णांमध्ये वाढ, एकूण बाधितांची संख्या 3,374 वर
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये दिल्या गेलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात कोरोना व्हायरस संसर्गाची संख्या वाढून 3,374 झाली आणि मृतांचा आकडा 77 वर पोहोचला आहे. माध्यमांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणाले की, कोरोन व्हायरसमुळे आतापर्यंत देशभरातील 274 जिल्हे बाधित झाले आहेत. पुण्य सलीला श्रीवास्तव, संयुक्त सचिव, गृह मंत्रालय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व राज्य सरकार लॉकडाऊन अंतर्गत मार्गदर्शक सूचना पाळत आहेत व प्रत्येक राज्यातील आवश्यक वस्तू व सेवांची परिस्थिती समाधानकारक आहे.

लव्ह अग्रवाल, संयुक्त सचिव, आरोग्य मंत्रालय यांनी कोरोना विषाणू वाढीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सध्या फक्त तबलीगी जमातमुळे भारतातील कोरोना विषाणू दुप्पट होण्याच्या वेग हा 4.1 दिवस इतका आहे. जर या लोकांना यातून वगळले तर हा दर 7.5 दिवस इतका असता. म्हणजेच तबलीगी जमात बाबतचे प्रकरण उद्भवणे नसते तर भारतात कोरोना व्हायरसचे विषाणू 7.5 दिवसांत दुप्पट झाले असते. भारतातील 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत. आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विषाणूचे संक्रमण होऊ शकते त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.

या संकटकाळात सध्या 27,661 मदत शिबिरे आणि निवारे संपूर्ण भारतभरातील सर्व राज्यांमध्ये स्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये सरकारकडून 23,924 व 3,737 स्वयंसेवी संस्थांकडून उभारण्यात आले आहेत, यामध्ये 12.5 लाख लोक आश्रय घेत आहेत. तसेच 19,460 अन्न शिबिरांचीची स्थापना केली गेली आहे. 13.6 लाख कामगारांना त्यांच्या मालकांकडून आणि कंपनीमार्फत निवारा आणि भोजन दिले जात आहे. (हेही वाचा: Coronavirus: MHRD च्या अंतर्गत येणा-या विविध शैक्षणिक संस्थांकडून PM CARES Fund ला 38 कोटींची मदत)

एका दिवसात तामिळनाडू, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोना विषाणूचे 74, 76, आणि 59 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 690 झाली आहे. यात मुंबई 29, पुणे 17, पिंपरी चिंचवड 04, अहमदनगर 03, औरंगाबाद 02 अशी 55 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 56 सदस्य बरे होऊन त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे.