Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

सध्या बिहार (Bihar) येथे निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. याआधी बिहारमध्ये मोफत कोरोना व्हायरस लसीवरून (Coronavirus Vaccine) राजकारण झाले होते. आता बिहार आणि तमिळनाडूनंतर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारने राज्यातील सर्व लोकांना मोफत कोरोना व्हायरस लस देणार असल्याचे सांगितले आहे. न्यूज 18ने याबाबत वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांचा हवाला देत, अहवालात म्हटले आहे की ही लस पुढील वर्षी मार्चपर्यंत उपलब्ध होईल. कोरोना व्हायरस संसर्गावर मात मिळवण्यासाठी यूपी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. परिणामी, 17 सप्टेंबरपासून, यूपीमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रमाणात सतत घट होत आहे.

अशात यूपीच्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील एका कार्यक्रमात आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लोकांना कोरोना लस मोफत मिळेल. मार्च 2021 पर्यंत कोरोनाची लस येणे अपेक्षित आहे व ही लस येताच यूपीतील लोकांना ती विनामूल्य दिली जाईल. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री म्हणाले की, कोरोनादरम्यान यूपीमध्ये आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न केले गेले आणि सरकार यात यशस्वी झाले, पुढे आम्ही आश्वासन देतो की आरोग्य सेवा सुधारत राहतील. कोरोना काळात आम्ही टीम वर्कद्वारे कार्य केले ज्याचा परिणाम समोर आहे. (हेही वाचा: सणासुदीच्या काळात महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये कोरोना व्हायरस प्रकरणांमध्ये वाढ; राज्यांशी संपर्क साधून नवीन धोरण ठरवले जाणार)

बिहारच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजप सत्तेत परत आल्यास राज्य सरकार इथल्या जनतेला मोफत लस पुरवेल असे आश्वासन दिले होते. त्यांनतर तमिळनाडू, मध्य प्रदेशातही कोरोना व्हायरसची लस मोफत दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की, त्यांचे सरकार राज्यातील गरीब लोकांना कोविड-19 लस मोफत देणार आहे त्याचा खर्च भाजपा सरकार उचलेल.