Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची नवी आकडेवारी आली आहे. ताज्या माहितीनुसार देशात सद्यास्थितीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) आणि कुटुंब कल्याण विभाग (Family Welfare) अशा दोघांनी ही माहिती संयुक्तरित्या दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालय अशी संयुक्त पत्रकार परिषद शुक्रवारी (3 एप्रिल 2020) दुपारी पार पडली. या पत्रकार परिषदेत देशातील कोरोना व्हायरस स्थिती आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरात आतापर्यंत कोरना व्हायरस बाधित 336 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2301 इतकी आहे. त्यातील 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 157 रुग्ण हे बरे झाले आहेत. मात्र, आता ताज्या माहितीनुसार ही आकडेवारी बरीच वाढली आहे. (हेही वाचा, Coronavirus in India: पश्चिम रेल्वे करणार 410 रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर; COVID 19 च्या रुग्णांसाठी विशेष सोय)

लव अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन दिवसांमध्ये तब्लीगी जमात मधील 647 जणांची पुष्टी झाली आहे. यातील अनेग जण देशातील 14 राज्यांमध्ये आढळले. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, असम, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, जम्मू-कश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, तमिलनाडु तेलंगाना, उत्तराखंड राज्यांचा समावेश आहे.

एएनआय ट्विट

लव अग्रवाल यांनी या वेळी सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांना अवाहन केले आहे की, त्यांनी डॉक्टरांना सहकार्य करावे. डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत रुग्ण आणि नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या गैरवर्तनाबाबत हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केल्याचेही अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, जगभरातही कोरोनाचा विळखा अद्यापही कायम आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमधील वूहान शहर हे कोरोना नियंत्रणात आले आहे. तेथील लॉकडाऊनही हटविण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी जगभरातील स्थिती मात्र अधिकच गंभीर होत चालली आहे. प्रामुख्याने इटली, अमेरिका, फ्रान्स, जर्मऩी आणि जपान या देशांसमोरील आव्हान अधिक वाढले आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणजे भारत अद्याप तरी कोरोनावर नियंत्रण ठेऊन आहे.