Coronavirus in India: पश्चिम रेल्वे करणार 410 रेल्वे डब्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर; COVID 19 च्या रुग्णांसाठी विशेष सोय
Western Railway (Photo Credits: File Photo)

भारत देशात कोरोना व्हायरसने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सातत्याने वाढणारी रुग्णांच्या संख्येमुळे विलगीकरण कक्षात वाढ करणे आवश्यक झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे. पश्चिम रेल्वेच्या भावनगर वर्कशॉप येथे COVID 19 च्या रुग्णांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी कोचचे रुपांतर विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे. मुंबई सह 6 ठिकाणी रेल्वे डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात येतील. एकूण 410 कोचेसचे रुपांतर विलगीकरण कक्षात करण्यात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक रेल्वे, बससेवा बंद करण्यात आली आहे. बंद असलेल्या रेल्वेचा वापर कोरोना रुग्णांसाठी करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेच्या भावनगर वर्कशॉपमध्ये विलगीकरण कक्षाचे काम सुरु आहे. कोरोना संशयित रुग्णांना या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत असल्याने पश्चिम रेल्वेने यात मुंबई विभागाचाही समावेश केला आहे. (भारतीय रेल्वेत 20 हजार विलगीकरण कक्ष तयार, 3 लाख 2 हजार बेडची सुविधा; रेल्वे मंत्रालयाची माहिती)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी पश्चिम रेल्वेचा हा निर्णय नक्कीच फायदेशीर ठरेल. यापूर्वीही भारतीय रेल्वेत 20 हजार विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली होती. तसंच रेल्वेकडून बेडची सुविधा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी पार्सल ट्रेन्सचीही सोय करण्यात आली आहे.