सोने-चांदीचे दर वाढले;  कोरोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावरही
Gold Rate | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसची वाढती दहशत आता शेअर बाजारावरही परिणाम दाखवत आहेत. शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे आता जगभरात गुंतवणूकदार सोनं आणि चांदीकडे वळले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये आज ( 27  जानेवारी) सोन्याचा भाव वधारल्याचं चित्र आहे. दरम्यान सराफा बाजारात एक तोळं सोन्याची किंमत 133 रूपयांनी वाढल्याचे वृत्त आहे. तर सोन्यासोबत चांदीचा भाव देखील वाढला आहे. आज चांदीचे दर 238 रूपयांनी वाढले आहेत. चीन मध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; Wuhan शहरातून भारतीयांच्या मदतीसाठी AIR India ची विमानं सज्ज!

दरम्यान आज (27 जानेवारी) पासून सुरू झालेल्या नव्या आठवड्यामध्ये पहिल्या सत्रात सोन्याचे दर 41 हजार 292 रूपये इतके झाले होते. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1 हजार 578 डोलर प्रति औंस इतकी झाली होती. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही वाढ पहायला मिळाली आहे. चांदीची किंमत 18.15 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे. आज चांदीचा दर 47 हजार 277 रुपये प्रतितोळा इतका पहायला मिळाला आहे.

दरम्यान अमेरिकन डॉलरच्या तुलानेत भारतीय रूपया देखील ढासळत आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतींवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर देखील दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. परिणामी सोनं महाग होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्याचं निदान आणि उपचारपद्धतींवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जगभरात या व्हायरसबाबत अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान आत्तापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 80 हून नागरिकांचा चीनमध्ये मृत्यू झाला आहे. आता मुंबई सह देशातील अनेक महत्त्वाच्या एअरपोर्टवर स्कॅनर लावण्यात आले असून प्रवाशांची तपासणी केली जात आहे.