देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांचा आकडा आता पाचशेच्याही वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Union Health Ministry) द्वारा प्राप्त आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस (COVID19) बाधित रुग्णांची संख्या 562 इतकी आहे. त्यातील 40 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोना रुग्णांचा विचार करता सर्वाधिक रुग्ण हे माहारष्ट्रात आहेत. नुकतेच राज्यात 18 नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 107 इतकी झाली आहे. यात दिलासादायक बाब अशी की, राज्यातील सुमारे 12 कोरोना व्हायरस पीडित रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेली उपाययोजना प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असले तरी, धोका पूर्ण टळला आहे. असे अजिबात नाही. अद्यापही दररोज नव्या रुग्णांची भर पडतच असून, बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये आढळलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येवर नजर टाकली असता मुंबई आणि पुण्याबाहेरच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या काही तासांत मुंबईत 6, सांगली येथील इस्लामपूर येथे 4, पुणे - 3, सातारा जिल्ह्यात 2 तर, अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे धोका कायम असल्याचे स्पष्ट होते. (हेही वाचा, Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी)
एएनआय ट्विट
Number of #COVID19 cases in India rises to 562(including 40 cured/discharged and 9 deaths): Union Health Ministry pic.twitter.com/eZamEOaDJQ
— ANI (@ANI) March 25, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी. किंबहूना त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (24 मार्च 2020) सकाळीच सांगतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे जाहीर केले. मध्यरात्री 12 वाजलेपासून या निर्णयाची देशभर अंमलबजावणी सुरु झाली आहे.