PM Narendra Modi On Kumbh Mela 2021: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (17 एप्रिल) देशातील जनतेला आणि साधू संतांच्या आखाड्याला अवाहन केले की यंदाचा कुंभ मेळा ( Kumbh Mela) हा प्रतिकात्मक साजरा करण्यात यावा. देशासमोर असलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट पाहता कुंभमेळा ( Kumbh Mela 2021) प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्यात यावा असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी फोनवरुन चर्चा केली. या वेळी त्यांनी यंदाचा कंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करवा असे म्हटले. कुंभमेळ्यात लाखो लोक येतात त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्ग होण्याच्या शक्यता अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभमेळा प्रतिकात्मक साजरा करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

स्वामी अवधेशानंद गिरि यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. सर्व संतांच्या आरोग्याबाबत जाणून घेतले. मी त्यांना अवाहन केले की देशातील दोन्ही शाही स्नान झाली आहेत. त्यामुळे आता कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करायला हवा. ही कोरोना विरुद्धची लढाई आहे. एकत्र लढल्याने ताकद मिळेल. सर्व साधू संतांनी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केल्याचेही पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा, Kumbh Mela 2021: हरिद्वार येथील कुंभमेळ्यात कोरोना विषाणू निर्बंधांची पायमल्ली; शाही स्नानावेळी तब्बल 102 भाविकांनी Coronavirus ची लागण)

दरम्यान, सुमारे 13 आखाड्यांतील साधू कुंभमेळ्यात सहभागी होतात. यापैकी 2 आखाड्यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे. या दोन आखाड्यांनी 17 एप्रिल रोजी कुंभ मेळा समाप्त होईल असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला काही राजकीय मंडळींनीही साधुसंतांशी संपर्क साधून कुंभमेळा लवकर समाप्त करण्यात यावा असे म्हटले आहे. या साधुंनी स्वत:हूनच कुंभ समाप्तिची घोषणा करावी असे म्हटले आहे.

हरीद्वारमध्ये वेगवेगळ्या अनेक आखाड्यांमधील साधू कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. यात आखाडा परिषदेचे अध्यक्ष णि निरंजणी आखाड्याचे महंत नरेंद्र गिरी यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेश येथून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे 13 एप्रिल रोजी कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले आहे. तर 5 एप्रिल पासून 14 एप्रिलपर्यंत कुंभमेळ्यात सुमारे 68 साथू संत कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.