देशातील कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. मागील 24 तासांत देशात 3722 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर 134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 78003 वर पोहचला आहे. त्यापैकी 26235 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 49219 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. दरम्यान 2549 रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असून गुजरात, तामिळनाडू यांसह इतर राज्यातही कोरोना प्रभाव वाढताना दिसत आहे. दिवसभरातील ताज्या बातम्या, लेटेस्ट कोरोना अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान कोरोना व्हायरस संकटातून भारताला सावरण्यासाठी मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्याचा नेमका कुठे आणि कसा वापर करणार याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल पत्रकार परिषदेद्वारे दिली.
ANI Tweet:
Spike of 3722 #COVID19 cases & 134 deaths in the last 24 hours. Total positive cases in the country is now at 78003, including 49219 active cases, 26235 cured/discharged/migrated cases and 2549 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/I5gHX0iXEC
— ANI (@ANI) May 14, 2020
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून नवनव्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. तर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. मात्र लॉकडाऊनचा हा नवा टप्पा कसा असणार, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. दरम्यान स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मिळेल त्या मार्गाने प्रवास करणे अनेक मजूरांच्या जीवावर बेतत आहे.