Coronavirus In India: भारतामध्ये एकूण 46433 कोरोनाबाधित;  24 तासांत 'कोरोना' चा कहर, दिवसभरात वाढले 3900 नवे रूग्ण तर 195 जणांचा बळी
Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव पसरण्याचा वेग आटोक्यात असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून येत असला तरीही आज (5 मे) भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 46433 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान यापैकी 32134 जणांवर देशभरात उपचार सुरू असून 12,727 जण कोरोनावर मात पुन्हा घरी परतले आहे. तर मृतांचा आकडा हा 1568 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान मागील 24 तासांत 3900 नवे रूग्ण तर 195 बळी गेले आहेत. ही आत्तापर्यंत दिवसभरात नव्या रूग्णांची भर आणि बळींच्या संख्येत झालेली सर्वात मोठी वाढ आहे. सध्या देशभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस प्रामुख्याने महराष्ट्रात आपला विळखा अजून घट्ट करत आहे. मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता मालेगाव आणि औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या 24 मार्च पासून भारतामध्ये असलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण आता भारतात अनेक ठिकाणी संचारबंदीच्या नियमांमध्ये बरीच शिथिलता देण्यात आली आहे.

मुंबई शहराला कोरोनाचा मोठा धोका आहे. वरळी, धारावी सह दाटीवाटीच्या भागात कोरोना फोफावू शकतो यामुळे मुंबई शहराला रेड झोनमधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. नव्या नियमांनुसार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय मदत याव्यतिरिक्त नगारिकांना बाहेर पडणं महागात पडू शकतं. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये 17 मे पर्यंत कलम 144 अंतर्गत संचारबंदी कायम- मुंबई पोलीस.

ANI Tweet

सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 14 हजार 541 चा आकडा गाठला आहे. आतापर्यंत एकूण 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याने केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचं पथक मुंबई, पुणे शहरामध्ये राज्य सरकारच्या मदतीला तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान गोवा हे कोरोनामुक्त झालं आहे. परंतू तरी देखील तेथे संचारबंदीचे नियम लागू असतील.