
कोरोनाचा हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) ठरलेल्या मुंबई (Mumbai) शहरात आता 17 मे पर्यंत कलम 144 अंतर्गत संचारबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजत आहे. वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त सर्व अनावश्यक सेवांसाठी एक किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास मुंबईत रात्री 8 ते सकाळी 7 च्या दरम्यान मनाई असेल. यापूर्वी मुंबई पोलिसांनी 25 मार्च रोजी लॉक डाउनच्या अंमलबजावणीसाठी कलम 144 लागू केला होता, त्यानंतर 2 वेळा लॉक डाऊनचा अवधी वाढवण्यात आल्याने प्रथम ३ मे पर्यंत तर आता 17 मे पर्यंत 144 अंतर्गत संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित भागांचे रेड, ग्रीन, ऑरेंज झोन मध्ये विभाजन; तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो पाहण्यासाठी क्लिक करा.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, कलम 144 लागू असताना रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत सार्वजनिक, धार्मिक, किंवा खाजगी ठिकाणी 1 किंवा त्यापेक्षा अधिकजण आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक तसेच वैद्यकीय कारण असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देऊन घराबाहेर पडू शकतात असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे . जमावबंदी कायदा कलम 144 नेमका आहे तरी काय; जाणून घ्या सोप्प्या शब्दात
दरम्यान, महाराष्ट्रात काल नवे 771 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 541 झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यापैकी 2645 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई व उपनगरात आढळून आले आहेत, एकट्या मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ही 9,310 इतकी मोठी आहे.