दिल्लीसह (Delhi) संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचे संकट वाढविणाऱ्या तबलीगी जमातवर (Tablighi Jamaat) सध्या कारवाई सुरू आहे. आता दिल्ली पोलिसांनी जमातचे प्रमुख अमीर मौलाना मोहम्मद साद (Maulana Muhammad Saad) यांच्यासह अनेकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. यासह व्हिसा नियमांचे उल्लंघन करणार्या 1900 जमातीच्या लोकांना पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावली आहे. दिल्ली पोलिसांकडून मौलाना साद यांच्यासह 17 जणांना चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, यापैकी 11 जण कोरोना व्हायरसमुळे आपण स्वतःला वेगळे ठेवले असल्याचे सांगून पोलिसांसमोर येण्यास टाळत आहेत.
मौलाना साद यांनीही स्वत: ला वेगळे ठेवले असल्याचे सांगितले आहे. मात्र आता त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपत आला असून, पोलिस त्यांना केव्हाही अटक करू शकतात अशी शक्यता वर्तवली गेली आहे. निजामुद्दीनस्थित असलेल्या तबलीगी जमातच्या मरकझचे कोरोना व्हायरस कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांनी मौलाना सादसह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. साथीचा कायदा आणि आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीनंतर पोलिसांनी आता या प्रकरणात कलम 304 (हेतुपुरस्सर) हत्या ही जोडली आहे. या कलमान्वये आता मौलाना साद यांना किमान दहा वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा: रस्त्यावर थुंकाल तर खबरदार! लॉकडाऊन कालावधीत केंद्रीय गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्व जारी)
सोबतच जमातच्या मरकझ येथे आलेल्या 1900 परदेशी लोकांविरूद्ध लुकआऊट परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की या लोकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले आणि कार्यक्रमास हजेरी लावली. पोलिसांनी मरकझ येथून 500 हून अधिक परदेशी लोकांसह 2300 हून अधिक लोकांना बाहेर काढले होते. दरम्यान दिल्लीत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 1561 आहे, त्यापैकी 1080 प्रकरणे तबलीगी जमातशी संबंधित आहेत. हीच परिस्थितीत महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये आहे.