Coronavirus In India: भारतात COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.32 टक्के तर मृत्यूदर 1.72 टक्क्यांवर पोहचला- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नुकत्याच अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु त्यावेळी नागरिकांना नियम आणि अटींचे पालन करणे अत्यावश्यक आहे. याच दरम्यान आता भारतातील एकूणच कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात बोलायचे झाले तर रुग्णांचा आकडा 41 लाखांच्या पार गेला आहे. परंतु कोरोनासंक्रमिक रुग्णांचा रिकव्हरी रेट 77.32 टक्क्यांवर आला आहे. ऐवढेच नाही तर आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील मृत्यूदर 1.72 टक्क्यांवर आला असून तो जगभरातील मृत्यूदराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

जगभरात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस अश्या लसीचे संशोधन केले जात आहे. तर अमेरिकेने काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोनावरील लस निर्माण केली असून त्याची चाचणी तिसऱ्या टप्प्यात पोहचल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी सुद्धा आम्हाला कोरोनावरील लस मिळाल्याचा दावा केला होता. कोरोना विषाणू पासून जर नागरिकांना बचाव करायचा असल्यास त्यांनी स्वत:सह परिवाराची सर्वोतोपरी काळजी घेणे, मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे हेच सध्याचे साधन आहे.(Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ! कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 41 लाख 13 हजार 812 वर)

दरम्यान, देशभरासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसचा कहर पहायला मिळत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघरसह औरंगाबाद हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारने अनलॉकिंग4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात जिम, धार्मिक स्थळ, मंदिरे, नाट्यगृहे, सिनेमागृहांसह तलतरण तलाव बंदच राहतील असे स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांच्या सुद्धा पार गेल्याचे दिसून आले आहे.