कोरोना व्हायरसचे भारतातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. दिवसागणित कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 324 झाली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 74 रुग्ण असून दोघांचा बळी गेला आहे. तर देशात एकूण 5 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात कोरोना व्हायरस स्टेज 2 ला आहे. त्यामुळे धोक्याची घंटा मिळण्यापूर्वी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जाते आहेत. मात्र तरी देखील रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेत टाकणारी आहे. (मुंबई मध्ये कोरोना बाधित रूग्णाचा दुसरा बळी; राज्यात COVID 19 पॉझिटिव्हची संख्या 74)
भारतात झपाट्याने होणारा कोरोना व्हायरसचा प्रसार लक्षात घेता आज 'जनता कर्फ्यू' चे आवाहन करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना व्हायरसाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.
ANI Tweet:
Number of Coronavirus cases in India rises to 324: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/l4mS0CefAP
— ANI (@ANI) March 22, 2020
देशासह महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत जीवावश्यक सुविधा वगळता सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवाही सामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शाळा, कॉलेज, जीम, स्विमिंग पूल, मॉल्स, थिएटर्स नंतर आता लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे.