COVID 19 लस बाबत ICMR चा दावा अवास्तव, नामुष्की टाळण्यासाठी आणि लाल किल्ल्यावरून घोषणा करण्यासाठी आटापिटा आहे का? पृथ्वीराज चव्हण यांचा सवाल
Prithviraj Chavan (Photo Credits: Facebook)

COVID 19 लस येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तयार होईल असा आयसीएमआर (ICMR) करत असलेला दावा अवास्तव आहे. लॉकडाऊन (Lockdown) गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या सर्वांमुळे केंद्र सरकारला आलेली नामुष्की या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा सर्व आटापिटा चालला आहे का? याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशा शब्दात काँग्रेस (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोवीड 19 साठीची लस येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तयार होऊ शकेल, अशी माहिती ICMR ने नुकतीच दिली होती. आयसीएमआरच्या या माहितीवर आक्षेप घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. चव्हाण यांनी या आधीही अनेक वेळा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे''. (हेही वाचा, Coronavirus: पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडले देवेंद्र फडणवीस यांचे आकडे; पोस्ट केला Video, दिले आव्हान)

दरम्यान, कोरोना व्हायरस म्हणजे कोविड 19 वर अद्यापही औषध उपलब्ध झाले नाही. जगभरातील संशोधक त्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही त्याला यश मिळाले नाही. कोरोनावर लस अथवा औषध तयार केल्याचा दावा जगभरातील अनेक संस्था, संशोधक आणि इतर मंडळींनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अधिकृतपणे मात्र या दाव्यांना त्यांनी तयार केलेल्या औषधांना पुष्ठी मिळू शकली नाही. भारतातही योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलिने कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला होता. तसेच, त्याचा योग्य तो परिणामही दिसल्याचे सांगितले होते. मात्र, या दाव्यात तथ्य नसून ते केवळ सर्दी, ताप, खोकल्यावरचे औषध असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे रामदेव बाबा यांच्या पतंजलिला घुमजावही करावे लागले आहोे.