Coronavirus: पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडले देवेंद्र फडणवीस यांचे आकडे; पोस्ट केला Video, दिले आव्हान
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत आकडेवारीला आकडेवारीने आव्हान दिले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान दिले आहे. देवेंद्र फडणवीस यानी काल (26 मे 2020) एक पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरस (Coronavirus) , लॉकडाऊन (Lockdown) काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला कशी मदत केली याची आकडेवारी दिली होती. फडणवीसांची आकडेवारी खोडून काढत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने किती कर्ज आणि किती रोख खर्च मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी द्यावी असं म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत आकडेवारीला आकडेवारीने आव्हान दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या आकडेवारी बद्दल बोलताना म्हटले आहे की, “महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे दोन लाख 70 हजार कोटी रुपये मिळाले, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच त्यांनी विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासवण्याचा प्रयत्न केला आहे, की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. पण काल मी सांगितल्याप्रमाणे विविध जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये फक्त दोन लाख कोटी रुपये ही रोख रक्कम आहे. जी पिस्कल सस्टीम्युलसआहे. उर्वरित 19 लाख कोटी हे कर्जाच्या स्वरुपातील मॉनेटरी स्टीम्युलस आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या दोन लाखापैकी जास्तीत जास्त 20 हजार कोटी रुपये रोख रक्कम मिळू शकते,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला आतापर्यंत 28 हजार 104 कोटींची मदत- देवेंद्र फडणवीस)
दरम्यान, व्हिडिओत चव्हाण यांनी पुढे म्हटले आहे की, “रिझर्व्ह बँकेच्या महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) पाच टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि ती रक्कम जवळपास 1 लाख 60 हजार कोटी आहे. पण ही दिशाभूल आहे. राज्यांना आधीपासून जीएसडीपीच्या तीन टक्के कर्ज घेण्याची परवानगी होतीच, ती आता दोन टक्क्यांनी वाढवून पाच टक्क्यांपर्यंत करण्यात आली, हे खरे आहे. परंतु त्या वाढीव दोन टक्क्यांपैकी फक्त अर्धा टक्का म्हणजे जास्तीत जास्त १५, १६ हजार कोटी रक्कम ही तातडीने मिळू शकेल. उर्वरित दीड टक्का रक्कमेची उचल म्हणजेच जवळजवळ ४५ हजार कोटी रुपये अदा करण्याआधी अनेक अटी आणि निकष पूर्ण करावे लागतील.
पृथ्वीराज चव्हाण फेसबुक व्हिडिओ
पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओच्या अंतिम भागात बोलताना म्हटले आहे की, “केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये विविध घटकांना कर्ज रुपाने रक्कम देण्याची तयारी र्शवली आहे. त्यामध्ये अनेक शर्थी आहेत. जो त्या अटी-शर्थी पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल, त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदाहरणार्थ किरकोळ विक्रेत्यांसाठी पाच हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी तीन लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का? ते उत्सुक नसतील तर राज्य किंवा केंद्र शासन सक्ती करु शकेल का? त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत मिळाली म्हणून दाखवणे हे चुकीचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारच्या वतीने कर्ज किती रोख खर्च किती, याची योजनानिहाय आकडेवरी दिली तर, राज्याला ताबडतोब किती दिलासा मिळेल याची माहिती मिळेल व चर्चाही होऊ शकेल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2020 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

