Pune Metro Timings In Ganpati: गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ, अनंत चतुर्दशीला 41 तास अखंड धावणार गाड्या

गणेशोत्सवादरम्यान भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोने आपल्या सेवांमध्ये वाढ केली आहे. 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान मेट्रो वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, अनंत चतुर्दशीला मेट्रो तब्बल 41 तास अखंड धावणार आहे.

Pune Metro Timings In Ganpati: गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ, अनंत चतुर्दशीला 41 तास अखंड धावणार गाड्या
Pune Metro (PC - Wikipedia)

पुणे शहरातील गणेशोत्सव भाविकांसाठी सुकर व्हावा, यासाठी पुणे मेट्रोने (Pune Metro) यंदा आपल्या सेवांचे वेळापत्रक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव काळात शहरभर फिरणाऱ्या भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोने विशेष नियोजन केले आहे.  17 ते 24 सप्टेंबर या कालावधीत पुणे मेट्रोच्या गाड्या सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत धावणार आहेत. यामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अनंत चतुर्दशीला 41 तास सलग सेवा

25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त मेट्रो सेवा तब्बल 41 तास अखंडपणे सुरू राहणार आहे. 25 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपासून ते 26 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो गाड्या न थांबता धावणार आहेत, जेणेकरून विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी गाडी

14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गर्दीच्या वेळेत दर 5 मिनिटांनी मेट्रो गाडी उपलब्ध असणार आहे, त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. उत्सव संपल्यानंतर 27 सप्टेंबरपासून मेट्रोचे नियमित वेळापत्रक पुन्हा सुरू होईल.

दर्शनासाठी कोणत्या स्थानकाचा वापर करावा?

पेठ भागातील गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी कसबा पेठ मेट्रो स्थानकाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर डेक्कन जिमखाना परिसरात जाणाऱ्या भाविकांनी पीएमसी मेट्रो स्थानकाचा वापर करावा, असे सुचवण्यात आले आहे.  गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी मेट्रोने केलेली ही वेळापत्रक वाढ भाविकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2026 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).