Nitin Gadkari | (Photo Credit-PTI)

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले असून रुग्णांचा संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची लॉकडाउनच्या काळात फार हाल होत असून त्यांना पुरेशा अत्यावश्यक सेवासुविधांचा लाभ घेता येत नाही आहे. ऐवढेच नाही तर या लोकांना आपल्या घरी परत जाण्यासाठी कोणत्याही वाहनाची सोय नसल्याने त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गावर कार्यरत असलेल्यांना या नागरिकांची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

नितीन गडकरी यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेकांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. त्यामुळे ही लोक महामार्गाने चालत आपल्या घरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या लोकांना अन्न, पाणी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास त्यांनी ती करा असा सल्ला महामार्गाचे अध्यक्ष, टोल नाक्यावरील कर्मचारी यांना दिला आहे.(Coronavirus: लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यास मुभा- जयंत पाटील)

तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 159 वर आणि देशात 700 च्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन केले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्याला येत्या 14 एप्रिल पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या दरम्यान कोरोनाचे युद्ध लढायचे असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत नागरिकांनी कोरोना व्हायरससंबंधित व्हायरल होणाऱ्या खोट्या माहितींवर विश्वास ठेवू नये असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.