भोपाळ: भगवे वस्त्र घालून मंदिरात बलात्कार होत आहेत, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त विधान (Watch Video)
Digvijay Singh (Photo Credits: ANI)

आपल्या मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत.. भगवी वस्त्रे घालणारे बलात्कार करत आहेत, असे म्हणत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal) येथे साधूंना संबोधित करून बोलत असताना एका कार्यक्रमात दिग्विजय यांनी वादग्रस्त विधान केले.  याशिवाय, एखादा माणूस कुटुंब सोडून साधू होतो, धर्मचारणासाठी अध्यात्म निवडतो मात्र आजच्या घडीला भगवी वस्त्र परिधान करुन काही लोक चूर्णही विकतात. या सगळ्यामुळे सनातन धर्माची बदनामी होत असल्याचा दावा सुद्धा दिग्विजय यांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, “भगवी वस्त्र परिधान लोक चूर्ण विकतात, भगवी वस्त्र परिधान करुन मंदिरांमध्ये बलात्कार केले जात आहेत. हाच आपला सनातन हिंदू धर्म आहे का? जे अशा पद्धतीने सनातन धर्माची बदनामी करत आहेत त्यांना देव कधीही क्षमा करणार नाही.” असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

ANI ट्विट 

याशिवाय, आपले भाषण संपवताना दिग्विजय यांनी जय श्री राम असा नारा सुद्धा लगावला. किंबहुना यावरही आक्षेप घेत आपण जय सिया राम असे म्हंटले पाहिजे, केवळ रामाचेच नाही तर सीता मातेचे सुद्धा स्मरण करायला हवे असा सल्ला देखील त्यांनी दिला. (RSS सरसंघचालक मोहन भागवत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी विदेशी मीडियाशी साधणार संवाद; पाकिस्तानला आमंत्रण नाही)

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिग्विजय यांनी बजरंग दल, भाजपा यांच्यावर सुद्धा निशाणा करत यांच्याकडून पाकिस्तानी दहशवादी संस्था आयएसआयला पैसे पुरवले जात असल्याचा देखील दावा केला होता. इतकेच नव्हे तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे ISI कडून पैसे घेणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पैसे घेणारे लोक एकच आहेत असेही ते म्हणाले होते. यानंतरचा वाद निवळतो तोपर्यंतच दिग्विजय यांनी नवा वाद सुरु केला आहे.