Rahul Gandhi and Narendra Modi (Photo Credits: ANI)

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज रविवार 29 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून कोरोना (Coronavirus) विरुद्ध सुरु असणाऱ्या लढाईत आपण काँग्रेस परिवाराच्या सह केंद्र सरकार सोबत आहोत असे आश्वासन दिले आहे. या पत्रात राहुल यांनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन विषयी मोदींना काही महत्वाचे सल्ले दिले. केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉक डाऊन मुळे कोरोनाला पूर्णतः थांबवणे शक्य होणार नाहीच उलट देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट येईल असा इशारा देताना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सरकारने अन्य उपाययोजना आखाव्यात असे मत राहूल यांनी व्यक्त केले. जगभरातील काही देशांनी कोरोना रोखण्यासाठी लॉक डाऊनचा (Lock Down) मार्ग जरी स्वीकारला असला तरी भारताच्या बाबत हे शक्य होणार नाही उलट आपल्याकडे हातावर पोट असणाऱ्या लोकांची आबाळ होईल आणि परिस्थिती बिघडेल असाही इशारा राहुल यांनी मोदी यांना दिला.

राहुल गांधी यांनी पत्रात म्हंटल्याप्रमाणे, लॉक डाऊन काळात अनेक कामगार आणि बड्या कंपन्यांमधील कर्मचारी सुद्धा आपापल्या गावाकडे निघाले आहेत, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गावात सर्वाधिक वयोवृद्ध जनता आहे आणि या वयातील लोकांना या व्हायरसची लवकर लागण होण्याची शक्यता असते, त्यामुळे गावाकडे जात असणाऱ्या मंडळींना थांबवण्याची गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कोरोनाचे रुग्ण कमी आहेत असे दिसत असले तरी लोकांची कोरोना चाचणीच झालेली नाही हे त्यामागील कारण असू शकते. त्यामुळे सरकारने रुग्णांची आकडेवारी स्पष्ट करण्यासाठी चाचणी केंद्रे वाढवण्याची गरज आहे. या परिस्थितीचा छोटे व्यापारी आणि कामगार वर्ग यांना फटका बसू नये यासाठी सुद्धा सरकारने धोरण आखणे गरजेचे आहे.

Coronavirus विरुद्ध लढाईत आर्थिक मदत करण्यासाठी PM Cares Fund मध्ये द्या योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन (Check Bank Account Details)

राहूल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र

दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा मोदी व मोदी सरकारला कोरोनाच्या भीषणतेची जाणीव करून दिली आहे. या संकटाला लढा देण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर सुद्धा अनेकदा राहुल यांनी भाष्य केले आहे. आजच्या या पत्रातून त्यांनी संकटकाळात मोदी सरकारच्या पाठीशी आहोत असे सांगत उपाययोजनांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.