मुलांच्या दप्तरांची अनेकदा शाळेत तपासणी केली जाते. यामध्ये मुलांनी शाळेत मोबाईल फोन किंवा इतर काही वस्तू आणली आहे का, ते पाहिले जाते. शहरांतील बऱ्याच शाळांमध्ये अशा प्रकारची तपासणी सर्रास केली जाते. आता बंगळुरू (Bengaluru) येथील एका शाळेत इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली असता, त्यांच्या बॅगमध्ये अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या, ज्यामुळे शाळेतील स्टाफचा धक्काच बसला. या तपासणीत विद्यार्थ्यांच्या बॅगमधून कंडोम, गर्भनिरोधक औषधे, लायटर, सिगारेट, व्हाईटनर आणि काही रोख रक्कम सापडली आहे.
एवढेच नाही तर काही विद्यार्थ्यांकडे दारूच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या बॅगमध्ये मोबाईल फोन लपवून वर्गात येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारीमुळे, कर्नाटकातील शाळा प्रशासनाने सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी सुरू करण्यास सांगितले होते. यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरांची झडती घेण्याची मोहीम राबवण्यात आली.
या झडतीमध्ये इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय बॅगची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये मोबाईलशिवाय कंडोमसह अनेक आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये असे साहित्य आढळून आल्यानंतर शाळा प्रशासन कठोर कारवाई करत आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलेल्या या साहित्याबाबत बैठका घेतल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर, बेंगळुरू येथील नगरभवी येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ‘शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या बॅगमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह साहित्याची माहिती दिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. विद्यार्थ्यांच्या वागण्यात अचानक झालेल्या बदलाबद्दल पालकांनी आमच्याशी बोलणे केले आहे.’ सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना निलंबित करण्याऐवजी पालकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच, शाळा प्रशासनाने पालकांना मुलांचे समुपदेशन करण्यास सांगितले आहे. यासाठी मुलांना 10 दिवसांची सुटीही देण्यात आली आहे. (हेही वाचा: आयआयटी पदवीधर नसल्यास बेंगळुरूमध्ये घर मिळणे अवघड; घरमालकांच्या भाडेकरूंकडून धक्कादायक मागण्या)
दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, दहावीच्या विद्यार्थिनीच्या बॅगेत कंडोम सापडला आहे. याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली की, ती एका खाजगी शिकवणीत शिकायला जाते. तिथे तिच्यासोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी तिच्या बॅगेत कंडोम ठेवले असावे. डी शशी कुमार, कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संबद्ध व्यवस्थापनाचे सरचिटणीस (KAMS) म्हणाले की, 80 टक्के शाळांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. मुलांच्या पिशव्यांमधून गर्भनिरोधक गोळ्याही सापडल्या आहेत. याशिवाय त्याच्या बॅगेत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. अशा गोष्टी टाळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.