Calcutta High Court (संग्रहित संपादित प्रतिमा)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) कवी श्रीजतो बंदोपाध्याय (Srijato Bandopadhyay) यांच्या विरोधात 2017 मध्ये त्यांच्या एका कवितेद्वारे हिंदू भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) शुक्रवारी पोलीस उपायुक्त, डिटेक्टिव्ह विभाग, बिधाननगर पोलीस आयुक्तालय यांना या तक्रारीच्या चौकशीचा सर्वसमावेशक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी, 17 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांनी दिले. बिधाननगर पोलीस आयुक्तालयाने यापूर्वी हे प्रकरण डिटेक्टिव्ह विभागाच्या डीसीपीकडे वर्ग केले होते.

याचिकाकर्ते बिप्लब कुमार चौधरी यांनी 21 मार्च 2017 रोजी बिधाननगर पोलीस स्टेशनमध्ये बंदोपाध्याय यांच्या विरोधात त्रिशूळावर कंडोम ठेवण्याबाबतच्या एका  कवितेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बंदोपाध्याय यांनी फेसबुकवर कथितरित्या ही कविता पोस्ट केली होती. या कवितेमध्ये त्रिशूळवर कंडोम ठेवण्याबाबत भाष्य करण्यात आले होते. त्रिशूल हे हिंदू विशेषत: शैवांसाठी पवित्र मानले जाते, म्हणून ही तक्रार दाखल झाली होती.

पोलिसांनी या तक्रारीबाबत कोणतीही पावले उचलण्यास नकार दिल्यानंतर, याचिकाकर्त्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, बॅरकपूर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी 1 एप्रिल 2017 रोजी विमानतळ पोलीस स्टेशनच्या प्रभारी निरीक्षकांना तक्रार एफआयआर मानून अनुपालन अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.

चौधरी यांचे वकील फिरोज इदुलजी यांच्या म्हणण्यानुसार, दंडाधिकार्‍यांनी आदेश दिल्यानंतर सुमारे 10 दिवसांनी 11 एप्रिल 2017 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी किंवा साक्षीदारांची चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. यामुळे चौधरी यांना 2017 मध्येच कोलकाता उच्च न्यायालयात जाण्यास प्रवृत्त केले. हायकोर्टात कारवाई सुरू असतानाच विमानतळ पोलीस ठाण्याने दंडाधिकार्‍यांना अंतिम अहवाल सादर केला.

या अहवालावर याचिकाकर्त्याचे समाधान झाले नाही आणि त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर निषेध याचिका दाखल केली. 7 डिसेंबर 2021 रोजी दंडाधिकार्‍यांनी पुढील तपासासाठी परवानगी दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करण्यासाठी वारंवार न्यायालयाकडे वेळ मागितला. अनेकवेळा हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले. (हेही वाचा: उज्जैनमध्ये काल रात्री गरबा मंडपात घुसलेल्या तीन तरुणांना लोकांनी केली बेदम मारहाण)

आपल्या याचिकेत वकील इदुलजी यांनी हिंदूंसाठी त्रिशूलचे महत्त्व आणि ही कविता आक्षेपार्ह का आहे यावर प्रकाश टाकला. सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने सांगितले की, विधाननगर पोलीस आयुक्तालयाने हे प्रकरण डिटेक्टिव्ह विभागाकडे वर्ग केले आहे. त्यानंतर न्यायमूर्ती मंथा यांनी डिटेक्टिव्ह विभागाच्या उपायुक्तांना, बिधाननगर पोलीस आयुक्तालय यांनी सादर केलेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.