Photo Credit- X

Medchal Shocker: वसतिगृहात स्वच्छतागृहामध्ये विद्यार्थिनींचे खाजगी व्हिडिओ (Private Video) गुप्तपणे रेकॉर्ड केले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर बुधवारी मेडचल(Medchal) येथील सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये (CMR Engineering College) निदर्शने झाली. आंदोलकांनी दावा केला की गेल्या तीन महिन्यांत सुमारे 300 व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले आहेत. ज्यात वसतिगृहातील कामगारांवर, विशेषतः स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांवर संशय आहे. कॉलेज व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आणि उघड केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

ही घटना उघडकीस आली जेव्हा विद्यार्थ्यांना वॉशरूममध्ये अनधिकृत रेकॉर्डिंगचा संशय आला. संतप्त झालेले विद्यार्थी कॉलेजबाहेर जमले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) या घटनेचा निषेध केला. त्यांनी या घटनेच्या सखोल चौकशी मागणी केला. दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मेडचल पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, भविष्यात असे गोपनीयतेचे उल्लंघन होऊ नये यासाठी वसतिगृहातील सुरक्षा सुधारण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कॉलेज व्यवस्थापनाने अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नसल्याने तणाव आणखी वाढला आहे. या घटनेचा संपूर्ण उलगडा करण्यासाठी आणि संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

तत्पूर्वी, ऑगस्ट 2024 मध्ये आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडलावल्लेरू इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर निदर्शने झाली. छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले व्हिडिओ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.