
हैदराबादच्या (Hyderabad) मेडचलमध्ये (Medchal) एका महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. येथे मुनिराबाद गावात 24 जानेवारीला एका 45 वर्षीय महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दगडतोडीचे काम करणाऱ्या मजुराला अटक केली आहे. या घटनेचे कारण पैशांवरून वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिला बोधन येथील रहिवासी असून गेल्या सहा महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत होती. कुशाईगुडा येथे रोजंदारीवर काम करून ती आपला उदरनिर्वाह करत होती. घटनेच्या दिवशी ती नातेवाईकाला भेटण्यासाठी मेडचल येथे आली होती.
आरोपी करीमनगर येथील रहिवासी असून, त्याने महिलेला पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यास तयार केले होते. दोघांमधील वादानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने महिलेची हत्या केली व घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी तिचा मृतदेह पेटवून दिला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास करून या दगडतोड करणाऱ्या मजुराला अटक केली आहे.
पैशांवरून झालेल्या वादानंतर हत्या-
माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिला मेडचल येथे आली होती, त्यावेळी तिचा आरोपीशी संपर्क झाला. आरोपीने तिला पैशांच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यास राजी केले, परंतु पैसे देण्यावरून दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर भांडणाचे रूपांतर हिंसाचारात झाले. महिलेने सुरुवातीला मान्य केल्यापेक्षा जास्त पैसे मागितल्याने संतप्त झालेल्या आरोपीने वादात तिची हत्या केल्याची माहिती आहे. हत्येनंतर, त्याने पेट्रोल खरेदी केले, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा: Hubballi Shocker: कर्नाटकातील हुबळी येथे पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; घटस्फोटाचा अर्ज करून करत होती 20 लाख रुपयांची मागणी)
आरोपीला अटक-
नंतर अंडरपासवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर सायबराबाद पोलिसांनी जलद तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी लुकआउट नोटिस जारी केल्या आणि महिलेची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला, ज्यामुळे तिची ओळख पटली. पीडितेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून व्यापक तपास केला, ज्यामुळे अखेर आरोपीला अटक करण्यात आली. आता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, भूतकाळातील अन्य गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्याचा सहभाग आहे का याचा तपास सुरु आहे.
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया- 1098, हरवलेली मुले आणि महिला- 1094, महिला हेल्पलाइन- 181, महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग- 112, राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन- 7827170170, पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन- 1091/1291.