China-India Border Dispute: चीनने घुसखोरी केलीच नाही असं पंतप्रधान मोदी का म्हाणाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
Prithviraj Chavan (Photo Credits: Facebook)

लद्दाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी सांगितले. यावर काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून, पंतप्रधानांनी असे विधान केलेच कसे, असा सवाल विचारला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज भारत-चीन संबंधावर केंद्र सरकारची भूमीका याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की,भारतीय हद्दीत चीनची घुसखोरी काँग्रेसला मान्य नाही. चीने भारतात घुसखोरी केली नाही असे पंतप्रधानांनी का म्हटले याचे स्पष्टीकरण द्यावे, असेही चव्हाण म्हणाले. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ‘शहिदों को सलाम दिवस’ राज्यभर पाळण्यात आला. या वेळी काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमीका व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, गलवान आणि लद्दाख प्रदेशात चिनी सैनिक तंबू बांधण्याचं आणि बंकर बांधण्याचं काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. असे असताना पंतप्रधानांनी विरोधी पक्षासह सर्वपक्षीयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अत्यंत गंभीर विधान केले. ते म्हणाले की भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केलीच नाही. पंतप्रधानांनी हे विधान नेमके का केले? याचे स्पष्टीकरण असून आले नाही. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत आहे, असेही चव्हाण या वेळी म्हणाले. (हेही वाचा, India-China Face-Off in Ladakh: देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन झाले नाही तर 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? पंतप्रधान मोदी यांच्या स्पष्टीकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल)

भारतीय जवानांचे बलीदान वाया जाणार नाही. म्हणजे वाया जाणार नाही म्हणजे सरकार नेमके काय करणार याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवे. तसेच, जे जवान शहीद झाले त्यांच्याबात बोलताना पंतप्रधानांनी चीनचा उल्लेखही केला नाही. तो का केला नाही याचेही उत्तर द्यावे असे चव्हाण म्हणाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि आपले पंतप्रधान यांच्यात चांगली मैत्री आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते 19 वेळा भेटले आहेत. अहमदाबाद येथे त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यामुळे चीनच्या राष्ट्राध्यक्षांना न दुकावण्यासाठी आपले पंतप्रधान असे वक्तव्य करत आहे का? असा प्रश्नही चव्हाण यांनी या वेळी उपस्थित केला.