लडाख (Ladakh) मधील गलवान खोऱ्यात (Galwan Valley) भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले. यामुळे देशातील वातावरण काहीसे तापले आहे. दरम्यान काल 19 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत-चीन मधील तणावपूर्ण संबंधांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यात भारताच्या सीमारेषेचं उल्लंघन झाले नाही. कोणत्याही प्रकारची घुसखोरी झाली नाही. ज्यांनी भारतमातेकडे डोळे वर करुन बघण्याचा प्रयत्न केला त्यांना वेळीच उत्तर देण्यात आले असे सांगितले. मोदींच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन झाले नाही तर 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सवाल केला आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले, "जर कुणी सीमेत घुसलं नाही , कुठल्या पोस्ट वर ताबा घेतला नाही मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची??" (India-China Face-Off in Ladakh: भारत-चीन सीमावादाविरुद्ध सर्व भारतीयांनी एकत्रित येत आवाज उठवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड)
Jitendra Awhad Tweet:
जर कुणी सीमेत घुसलं नाही , कुठल्या पोस्ट वर ताबा घेतला नाही मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची??
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 20, 2020
राष्ट्रहित हे आपले लक्ष्य असून ते जपण्यासाठी आपले लष्कर आणि जवान सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. दरम्यान सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून पुढच्या रणनीतीसाठी महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर चीन विरोधी सरकारच्या धोरणात मोदी सरकारला सर्व पक्षांनी पाठींबा दर्शवला आहे.