अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) मधून बेपत्ता झालेल्या 5 तरुणांना आज (शनिवार. 12 सप्टेंबर) रोजी चीनी सैन्याने भारताच्या (India) ताब्यात दिले. अरुणाचल प्रदेशामधील डोंगराळ भागात रस्ता चुकल्याने हे तरुण भरकडले होते. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील नाचो गावात राहणारे काही तरुण जंगलात शिकारीसाठी गेले होते. यापैकी 2 जण सुखरुप परतले. तर 5 जण रस्ता भरकडले आणि सीमा पार करुन चीनमध्ये (China) गेले.
या 5 जणांना चीनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतले. अरुणाचल प्रदेशातील रस्ता भरकडलेल्या युवकांना आम्ही भारताच्या ताब्यात देऊ, याची खात्री चीनच्या पीएलए भारतीय सैन्याला दिली असल्याची माहिती गेल्या शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू (Kiren Rijiju) यांनी ट्विट करत दिली होती. तसंच त्यांना 12 सप्टेंबर रोजी कोणत्याही वेळी एका विशिष्ट जागी भारताकडे सोपवण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.
रस्ता भरकडलेले हे भारतीय युवकांनी भूलवश चीनी सीमेवरुन चीनमध्ये प्रवेश केला. हे 5 जण 2 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. रस्ता भरकडल्याने चुकून त्यांनी चीनमध्ये प्रवेश केला. सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगतु एबिया, तनु बाकर आणि नगरु दिरी अशी या पाच तरुणांची नावे आहेत.
2 सप्टेंबर रोजी हे 5 युवक बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक पोलिस किंवा भारतीय सैन्याला नव्हती. तरुण बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक मीडियाकडून देण्यात आली. हे 5 जण अप्पर सुबानसिरीच्या नाचो जवळील जंगलात शिकारीसाठी गेले होते. रस्ता भरकडल्यानंतर चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या या युवकांना चीनी सैन्याने पकडले. भारत-चीन सीमा ही अप्पर सुबानसिरीपासून 170 किमी लांब आहे. तर इटानगरपासून 280 किमी लांब आहे.
बेपत्ता झालेले युवक चीनच्या हद्दीत सापडले असून त्यांना सुखरुप घरी आणण्यासाठी पाऊले उचलली जात असल्याची माहिती 8 सप्टेंबर रोजी किरण रिजिजू यांनी दिली होती. या 5 युवकांच्या सुटकेसाठी भारतीय सेनेकडून चीन सेनेला एक हॉटलाईन मेसेज पाठवण्यात येईल, अशी माहिती भारताच्या केंद्रीय मंत्र्यांकडून देण्यात आली होती. भारत आणि चीनमध्ये लडाखवरुन होत असलेल्या वादादरम्यान ही घटना घडून आली.