काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीत देशातील समविचारी पक्षांची एक बैठक आज (22 मे 2020) पार पडत आहे. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच उपस्थिती दर्शवणार आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown) आणि देशातील सद्यास्थिती, कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या, घसरलेली अर्थव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणार आहे. देशातील विविध विरोधी पक्ष या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तर काही विरोधी पक्ष या बैठकीपासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचे वृत्त आहे.
बैठकीस उपस्थित राहणारे नेते
दरम्यान, सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन आणि राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष आर. अजितसिंग आणि कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी उपस्थित राहणार असल्याचे समजते. दरम्यान, जनता दल (सेक्युलर)मधील एच डी देवेगौडा आणि फारुक अब्दुल्ला किंवा ओमर अब्दुल्ला तसेच आरएलएसपी अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे नेतेही या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, PM CARES Fund: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात FIR; पीएम केअर्स फंडाबाबत संभ्रम पसरवल्याचा आरोप)
दरम्यान, सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीस अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, उत्तर प्रदेशातील समजावादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे समजते. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावरुन नाराजी असल्याने हे दोन्ही पक्ष या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे समजते.