देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेशी (HDFC Bank) संबंधित एक अतिशय रंजक घटना समोर आली आहे. बँकेने रविवारी एका रात्रीत त्यांच्या अनेक ग्राहकांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले. जर अचानक तुमच्या बँक खात्यात अपेक्षेपेक्षा जास्त रोकड आली तर तुमची काय अवस्था होईल? असेच काहीसे या एचडीएफसीच्या खातेधारकांबाबत घडले.रविवारी बँकेच्या 100 खातेधारकांच्या खात्यात अचानक 13 कोटी रुपये जमा झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी रात्री तामिळनाडूमधील एचडीएफसी बँकेने 100 हून अधिक ग्राहकांच्या खात्यात 1300 कोटी रुपये ट्रान्सफर केले. बँकेने प्रत्येक ग्राहकाच्या खात्यात 13-13 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि अवघ्या एका दिवसांत त्यांना कोट्याधीश बनवले. हे प्रकरण तामिळनाडूतील टी.नगर येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेशी संबंधित आहे. यातील एका ग्राहकाने बॅलन्स क्रेडिटचा मेसेज पाहून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांच्या तपासात बँकेकडून सांगण्यात आले की, तांत्रिक बिघाडामुळे खातेदारांच्या मोबाईल क्रमांकावर चुकून असा एसएमएस पाठवला गेला. एचडीएफसीच्या या शाखेत सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ही चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. एचडीएफसीच्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन सांगण्यात आले आहे की, बँकेच्या प्रणालीतील तांत्रिक समस्येमुळे ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. (हेही वाचा: केंद्राने PMEGP वित्त वर्षे 2025-26 पर्यंत वाढवला, 40 लाख नवीन रोजगार निर्माण होणार, जाणून घ्या सविस्तर)
बँकेला ही चूक समजताच बँकेने या खातेदारांच्या खात्यातून पैसे काढण्यास तत्काळ बंदी घातली. या कालावधीत खातेदार बँकेत पैसे जमा करू शकत होते मात्र, ही समस्या दूर होईपर्यंत त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली होती. याशिवाय, खात्यांमध्ये जमा केलेले जादा पैसे काढले गेले आहेत का, याचीही तपासणी बँकेने केली. रविवारी सायंकाळपर्यंत हे प्रकरण निकालात निघाले आणि त्यानंतर ग्राहकांची खाती पूर्ववत करण्यात आली.