Ranjit Singh Murder Case: डेरा सच्चा सौदाचा Gurmeet Ram Rahim आणि इतर चार जणांना जन्मठेपेची शिक्षा; विशेष सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय
Gurmeet Ram Rahim Singh (Photo Credits: ANI)

रणजीत सिंह हत्या प्रकरणात (Ranjit Singh Murder Case) सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय सोमवारी आला. डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीमला (Gurmeet Ram Rahim) या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवण्यात आले होते. आता न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय अन्य चार आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. न्यायालयाने राम रहीमला 31 लाख आणि उर्वरित आरोपींना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने, प्रशासनाने निकाल येण्यापूर्वीच पंचकुला जिल्ह्यात कलम 144 लागू केले होते.

10 जुलै 2002 रोजी डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची हत्या झाली. सुरुवातीला हरियाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, परंतु नंतर हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी या प्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाले. तसेच, ऑक्टोबरच्या सुरुवातीला कोर्टाने राम रहीमसह 5 लोकांना दोषी ठरवले. यानंतर, सोमवारी, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा तपशीलवार निकाल दिला. ज्या अंतर्गत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2017 पासून दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला होता. त्यावेळी पंचकुलासह अनेक ठिकाणी दंगली, जाळपोळ आणि तोडफोड झाली होती. या घडलेल्या मोठ्या प्रमाणावरील हिंसाचारात 36 लोक मारले गेले.

गेल्या सुनावणी दरम्यान, सीबीआयने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती, पण नंतर राम रहीमने एक नवीन युक्ती अवलंबत आजारपणाचे कारण देत न्यायालयाकडे दयेची विनंती केली. राम रहीमने सांगितले की, तो रक्तदाब, डोळे आणि किडनीच्या समस्यांशी झुंज देत आहे, त्यामुळे त्याची सुटका झाली पाहिजे. आता 2017 मधील घटनेची पुनरावृती होऊ नये म्हणून प्रशासनाने कडक बंदोबस केला होता. (हेही वाचा: पोलिसाच्या कारची दोन मुलींना जोरात धडक; एकीचा जागीच मृत्यू, CCTV मध्ये कैद झाली अंगावर काटा आणणारी घटना)

दरम्यान, गुरमीत राम रहीम सिंहचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत आणि हरियाणा आणि पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांना राम रहीमचा पाठिंबा हवा आहे. असे सांगितले की, हरियाणातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला डेरा सच्चा सौदाचा पाठिंबा मिळाला आणि नंतर राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाले.