बैलाचे अंत्यसंस्कार (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सध्या सर्व देशभर लॉकडाउन (Lockdown) आहे. फक्त महत्वाच्या कामानिमित्तच घरातून बाहेर पडण्याची मुभा आहे. असे असूनही, तामिळनाडूच्या मदुराई (Madurai) मधील मदुवरपट्टी येथे बैलाच्या अंत्यदर्शनासाठी (Bull's Funeral) हजारो लोक जमा झाले होते. आता या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. 12 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. जल्लीकट्टू कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या बैलाच्या अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक एकत्र आले होते. अशाप्रकारे तामिळनाडूमध्ये लॉक डाऊन मोडणाऱ्या एकूण 3000 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका बैलाचे मोठ्या प्रमाणात अंत्यासंस्काराचे आयोजन केले जात आहे हे समजताच,  जिल्हा प्रशासनाने घटना स्थळी पोहचून गर्दी पांगवली व चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी जिल्हा दंडाधिकारी टी.जी. विनय यांच्या आदेशानुसार बैलाच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या आधारे सहभागी झालेल्या लोकांची ओळख केली जाईल.

तामिळनाडू पोलिसांनी बुधवारी सांगितले की, आतापर्यंत लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे दोन लाख एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, तर दीड लाखाहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. दुसरीकडे, मास्क नसलेल्या लोकांकडून 100 रुपये दंड आकारला जाईल आणि त्याचप्रमाणे वाहनचालकांचा वाहन चालक परवाना निलंबित करण्यात येईल, असा इशारा मनपाने दिला आहे. (हेही वाचा: प्रवाशांनी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत विमानाचे तिकिट बुकिंग केले असल्यास रिफंड 3 आठवड्यात मिळणार)

तामिळनाडू राज्यावरही कोरोना विषाणूचा तीव्र परिणाम झाला आहे. बुधवारी राज्यात कोरोना व्हायरस संसर्गामुळे झालेल्या दोन मृत्यूनंतर, मृतांची संख्या 41 वर पोचली आहे. या व्यतिरिक्त 38 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, संक्रमित लोकांची संख्या 1,242 वर पोहोचली आहे.