'जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल आम्हाला लाज वाटले'; इंग्लंडच्या धर्मगुरूचे स्मारकासमोर क्षमा मागत लोटांगण
बिशपने घातले लोटांगण (Photo Credit : ANI)

13 एप्रिल 1919, संपूर्ण भारताला हादरवणारा जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh Massacre) दिवस. जनरल डायरच्या आदेशाने झालेल्या अमानुष गोळीबारात अनेक लोक शहीद झाले होते. हा दिवस आणि ही घटना भारतीय इतिहासातील सर्वात जास्त नरसंहारापैकी एक होती. याबाबत नुकतेच इंग्लंडच्या बिशपने स्मारकासमोर जमिनीवर लोटांगण घालून माफी मागितली आहे. ब्रिटीश ख्रिश्चन धर्मगुरू आर्कबिशप ऑफ कॅटरबरी (Archbishop of Canterbury) जस्टिन पोर्टल वेलबी (Justin Welby) यांनी जालियानवाला बाग घटनेबद्दल शोक व्यक्त केला व घडलेल्या घटनेबाबत भारतीयांची क्षमा मागितली.

एएनआय ट्विट -

मुख्य बिशप जस्टिन पोर्टल वेलबी मंगळवारी अमृतसरमध्ये दाखल झाले. आपल्या भारता भेटीत त्यांनी जालियानवाला बागेत असलेल्या शहिदांच्या स्मारकांसमोर शहिदांना वंदन केले. यावेळी ते म्हणाले, 'शहीदांचे हे स्मारक सदासर्वकाळ जिवंत राहिल. येथे घडलेल्या गुन्ह्याबद्दल मला प्रचंड वाईट वाटते आणि त्याबद्दल मी माफी मागतो.' यावेळी त्यांनी व्हिझीटर्स बुकमध्ये घडलेल्या घटनेबद्दल आपल्याला अक्षरशः लाज वाटते असे लिहिले. तसेच याबाबत त्यांनी देवाकडेही माफी मागितली आहे.

दरम्यान,1997 मध्ये इंग्लंडची राणी महाराणी एलिझाबेथ भारतदौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी या हत्याकांडात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. पुढे 2013 मध्ये इंग्लंडचे प्रंतप्रधान डेव्हिड कॅमेरून ज्यावेळी भारतभेटीवर आले होते त्यावेळी त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली होती, व ही घटना म्हणजे ब्रिटिश इतिहासातील लज्जास्पद घटना असल्याचे वक्तव्य केले होते.