File image of Amit Shah | (Photo Credit: IANS)

पश्‍चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याच्या एका वर्षानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. गुरुवारी सिलीगुडी येथील रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी CAA बद्दल अफवा पसरवत आहेत की CAA लागू होणार नाही. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीत CAA लागू करू.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाची लाट कमी होताच सीएएवर काम सुरू होईल. CAA केंद्राच्या अजेंड्यावर आहे आणि ते कोणत्याही किंमतीत पूर्ण केले जाईल. यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या की, ‘ते वर्षभरानंतर ते इथे आले आहेत. ते प्रत्येक वेळी इथे येतात आणि घाणेरडे बोलतात. सीएए ही योजना आहे आणि तसे असेल तर ते हे विधेयक संसदेत का मंजूर करून घेत नाहीत. भाजप 2024 मध्ये सत्तेत येणार नाहीत. कोणाच्याही नागरिकत्वाच्या अधिकारावर गदा येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आपली एकता हीच आपली ताकद आहे.’

CAA बाबत 2019 च्या उत्तरार्धात आणि 2020 च्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अमित शाह म्हणाले की, कोरोनाचा प्रसार कमी होताच CAA लागू केला जाईल. सीएए हे वास्तव आहे आणि ते वास्तव राहील. तृणमूल काँग्रेस याबाबत काहीही करू शकत नाही. सुधारित नागरिकत्व कायदा 2019 मध्ये आला, तेव्हापासून 2020 पर्यंत, दिल्लीच्या शाहीन बागमध्ये अनेक महिने प्रचंड आंदोलन झाले. याबाबत शासन कधीच बॅकफूटवर आले नसले तरी आता इतके दिवस त्याची अंमलबजावणी न झाल्याने सरकार ते लागू करणार नसल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा: 'राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही,' भाजप खासदार Brijbhushan Sharan Singh यांचा इशारा)

CAA चा उद्देश अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये छळ झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या सदस्यांना नागरिकत्व प्रदान करणे आहे. 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या या समुदायांतील स्थलांतरितांना ते नागरिकत्व प्रदान करेल. दरम्यान, एका मेगा क्रॉस-कंट्री दौर्‍याचा एक भाग म्हणून शाह पुढील तीन आठवड्यांत सात राज्यांचा दौरा करतील. या दरम्यान ते सार्वजनिक, राजकीय आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. शाह हे सध्या पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आसाम, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचा दौरा करणार आहेत.