भारतीय जनता पक्षाचे (BJP) महत्वाचे नेते आणि केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh), हे देशात फुट पाडणाऱ्या लोकांना नेहमीच सतर्क करत असतात. तसेच आपल्या खात्याचा गोडवा गाण्यातही ते धन्यता मानतात. मेरठ (Meerut) येथे मंत्री गिरीराज सिंह यांनी रविवारी मेरठ जिल्हा सहकारी बँकेच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यांच्यासमवेत मेरठचे भाजप खासदार राजेंद्र अग्रवाल आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी त्यांनी देश तोडणाऱ्या लोकांबद्दल भाष्य केले.
यावेळी बिहारमधील बेगूसरायचे भाजप खासदार गिरीराज सिंह म्हणाले की, 'देशातील काही लोकांना भारत फोडायचा आहे. अशा परिस्थितीत देशातील जनतेला त्यांच्याविषयी जागरूक केले पाहिजे, जेणेकरून देश विकासाच्या मार्गावर जाऊ शकेल.' यावेळी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही मंत्री गिरिराज सिंग यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, 'नेहरू हे अजून काही काळाकरीता देशात असते, तर येथील पशुपालन, मत्स्यपालनासारख्या उद्योगाची परिस्थिती खूपच बिकट झाली असती.
त्यानंतर त्यांनी देशातील जनतेला एक रोजगाराची दिशा दाखवली. ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश प्रगतीच्या मार्गावर आहे. आता आपण चार जनावरे पाळू शकता आणि त्यांच्या शेण आणि गोमूत्रातून वर्षामध्ये सुमारे 20 लाख रुपये कमवू शकता. माझ्या विधानावर लोक म्हणतील की गिरिराज वेडा आहे, पण लक्षात घ्या एक किलो शेणापासूनही 20 रुपये मिळू शकतात. त्यानंतर दुधाचा नफा वेगळा आहे. जनावरे पालनात मोठा रोजगार आहे. प्रत्येकाला देशात अन्न हवे आहे पण कोणालाही शेती करायची इच्छा नाही. आज शेती हा फायद्याचा सौदा नाही, परंतु नरेंद्र मोदी सरकार शेतीला नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.'