अमृतसरमधील निरंकारी भवनावर हल्ला (Photo Credit : ANI)

अमृतसरमधील राजासांसी परिसरात आदिवाल गावात निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. रविवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे तर दहाजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निरंकारी भवनामध्ये दर रविवारी सत्संगचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे आजही सत्संग सुरु असताना दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने बॉम्ब फेकला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.

स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लोकांची पळापळ सुरु झाली. पोलिस घटनास्थळी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसंच हल्लेखोरांचाही शोध सुरु आहे.