आयकर विभागाने बीबीबीसीच्या दिल्ली येथील कार्यालयात पाहणीसाठी हजेरी लावली. ही कारवाई सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला भारतीय जनात पक्षाने बीबीसीवर जोरदार हल्ला (BJP On BBC) चढवला आहे. भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही मीडिया संस्थेला देशातील नियम आणि नियमांचे पालन करावे लागेल, असा इशारा भाजपने दिला आहे. भाजप (BJP ) प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बीबीसीवर हल्ला चढवत म्हटले आहे की, बीबीसी (BBC) ही जगातील सर्वात 'भारत बकवास कॉर्पोरेशन' बनली आहे. गौरव भाटीया यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बीबीसीवर मंगळवारी (14 फेब्रुवारी) दिल्ली येथे हल्ला चढवला. ते म्हणाले, आयकर विभागाने बीबीसीच्या कार्यालयावर कायदेशीररित्या छापे टाकले आहेत. काँग्रेसच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणा अथवा संस्थांना म्हटल्या प्रमाणे या संस्था आता 'पिंजऱ्यातील बंद पोपट' राहिल्या नाहीत.
जागतिक पातळीवर होणारी भारताची वाढ आण कौतुक काही आंतरराष्ट्रीय संस्था सहन करु शकत नाहीत. बीबीसी ही प्रसारमाध्यम संस्था हिदेखील त्यात आहे. त्यामुळे बीबीसी आता 'भ्रष्ट बकवास कॉर्पोरेशन' बनली आहे. दुर्दैवाने, बीबीसीचा प्रचार आणि काँग्रेसचा अजेंडा एकाच धर्तीवर आहे. आज भारत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली खूप उंची गाठत आहे आणि काही वर्गांना हे आवडत नाही. बीबीसीला भारतात पत्रकारिता करण्याचे सर्व अधिकार आहेत, परंतु त्यांना देशाच्या कायद्याचे पालन करावे लागेल, असेही भाटीया यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. (हेही वाचा, दिल्ली येथील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाकडून पाहणी, कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप, फोन जप्त केल्याचे वृत्त)
दरम्यान, विविध दाखले देत गौरव भाटीया यांनी बीबीसीवर भारतियांच्या भावनांचा अपमान केल्याचा आरोपही केला. काही घटनांचा उल्लेख करत भाटीया यांनी म्हटले की, बीबीसीने त्यांच्या एका कार्यक्रमात काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या एका दहशतवाद्याचा ( कारवाईत मारला गेलेला लश्कर ए तैयबाचा कमांडर बुऱ्हान वानी) करिश्माई तरुण क्रांतिकारक असा उल्लेख केला. ही कसली पत्रकारिता आहे? असा सवाल भाटीया यांनी व्यक्त केला.
बीबीसीवरील आपला हल्ला कायम ठेवत भाटीया म्हणाले, तुम्ही (बीबीसी) भारतात काम करत आहात. पण आमच्या संविधानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहात. बीबीसीने एका लेखात असे म्हटले आहे की होळी हा 'अस्वच्छ' सण आहे. तुम्हाला (बीबीसी) आमच्या सणांबद्दल काय माहिती आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.