विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सत्ताधारी पक्षाच्या भाजप खासदाराला दिलेल्या धक्क्यामुळे मी खाली पडलो आणि माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, असा आरोप खासदार प्रतापचंद्र सारंगी (Pratap Sarangi) यांनी केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Parliament Winter Session), संसद सभागृहात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारावरुन देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. विरोधी पक्षात असलेल्या इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि घटक पक्षांनी शाह यांच्या विधानावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. हा आक्षेप नोंदवताना विरोधकांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शनेही केली. याचवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष झाल्याचे समजते.
प्रताप सारंगी यांचा आरोप काय?
भाजप खासदाराने आरोप केला की, राहुल गांधी यांनी खासदारांना धक्काबुक्की केली. संसदेमध्ये मी पायऱ्यांजवळ उभा होतो. या वेळी राहुल यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो माझ्या अंगावर पडला. ज्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो, असे प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबतचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स (जुने ट्विटर) हँडलवरही सामायिक केला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू)
भाजपच्या आरोपास काँग्रेसचे प्रत्युत्तर
संसदेच्या मकरद्वार प्रवेशद्वारावर,दोन्ही पक्ष निदर्शने करत होते. त्याच वेळी धक्काबुक्कीचा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेसने या प्रकारबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. निदर्शनादरम्यान झालेल्या गदारोळात भाजप खासदारांनी आपल्यावर दबाव आणला, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी केला. काँग्रेसने सारंगीचे आरोप फेटाळून लावले आणि गोंधळाला भाजपने चिथावणी दिल्याचा दावा केला. भाजप खासदारांनी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना धक्काबुक्की करून अस्वस्थ परिस्थिती निर्माण केली, असे काँग्रेस प्रवक्त्याने म्हटले आहे. (हेही वाचा -'One Nation One Election' Bill: लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक; विरोधकांनी केला विरोध (Watch))
#WATCH | Delhi | BJP MP Pratap Chandra Sarangi says, "Rahul Gandhi pushed an MP who fell on me after which I fell down...I was standing near the stairs when Rahul Gandhi came and pushed an MP who then fell on me..." pic.twitter.com/xhn2XOvYt4
— ANI (@ANI) December 19, 2024
प्रकरण काय?
संसद सभागृहात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढले. आजकाल आंबेडकर. आंबेडकर म्हणण्याची फॅशन आली आहे. इतका जप जर परमेश्वराचा केला असता तर, स्वर्गात जागा मिळाली असती, असे उद्गार शाह यांनी काढले. त्यानंतर देशभर एकच गदारोळ निर्माण झाला. या वक्तव्याबद्दल शाह यांनी माफी मागावी आणि त्यांनी पदाचा राजीनामाही द्यावा, अशी मागणी जोर पकडत आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटू लागले आहे. महाराष्ट्रातही विरोधकांनी विधिमंडळ आवारात जोरदार निदर्शने केली. तसेच, समाजातही सार्वजनिक ठिकाणी तीव्र आंदोलने होत आहेत.