बिहारची (Bihar) राजधानी पाटणामध्ये (Patna) माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली आहे. येथे गुंडांनी एका दलित महिलेला 1500 रुपयांच्या कर्जासाठी विवस्त्र करून मारहाण केली आणि नंतर तिच्यावर लघवी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाटणा जिल्ह्यातील खुसरुपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर दलित समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत.
माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीने वर्षभरापूर्वी याच गावातील प्रमोद सिंह याच्याकडून व्याजावर 1500 रुपये घेतले होते. मात्र हे उधारीचे पैसे परत प्रमोद सिंग याने त्याच्या साथीदारांसह दलित महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. यातील एकाने आपल्यावर लघवी केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. जखमी महिलेवर खुसरुपूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपींकडून व्याजावर 1500 रुपये घेतले होते. यातील व्याज आणि मूळ रक्कमही परत केली. मात्र यानंतरही अधिक रक्कम थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. पैसे न दिल्यास गावात नग्न धिंड काढण्याची धमकी दिली जात होती. अशात शनिवारी रात्री उशिरा सिंग याने आपला मुलगा आणि साथीदारांसह महिलेला जबरदस्तीने आपल्या घरी नेले. तेथे तिला विवस्त्र करून काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर सिंग यांच्या मुलाने महिलेवर लघवी केली. पिडीत महिला कसा तरी आपला जीव वाचवून तिथून पळून गेली. (हेही वाचा: ब्रिज भूषण संधी मिळताच महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करायचे: दिल्ली पोलिसांचा कोर्टात दावा)
खुसरुपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सियाराम यादव यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादव म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण कर्जाच्या पैशांच्या संदर्भात असल्याचे दिसत आहे. महिलेच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तपासानंतरच काही सांगता येईल.