![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/11/FotoJet-1.jpg?width=380&height=214)
Corruption In Bihar: बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर पत्नी राबडी देवी यांचे बंधू आणि त्यांचे मेहुणे माजी खासदार सुभाष यादव यांनी माजी गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये सुभाष (Subhash Yadav) यांनी दावा केला आहे की लालूंनी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि अपहरणाच्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांशी वाटाघाटी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आगामी बिहार विधानसभा 2025 (Bihar Elections 2025) च्या तोंडावर हे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोप-प्रत्यारोपांनी बिहारचे राजकारण आगामी काळात तापण्याची शक्यता आहे.
'बिहारमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता नाही'
बिहारमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याच्या शक्यता लालू प्रसाद यादव यांनी फेटाळून लावल्या. त्यांनी म्हटले की, बिहारच्या जनतेने भाजपला ओळखले आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही येथे आहोत तोपर्यंत भाजप येथे सरकार स्थापन करु शकत नाही. दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणा आदी राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप विजयी झाला आहे. त्यामुळे बिहारमध्येही या विजयाची पुनरावृत्ती होण्याचा दावा भाजप करत आहे. त्यावर हा दावा फेटाळून लावताना लालू प्रसाद यादव यांनी भाजप बिहारमध्ये सत्तेत येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या. दरम्यान, त्याच दिवशी त्यांचे मेहुणे सुभाष यादव यांनी लालूंवर आरोप केले आहेत. (हेही वाचा, ED Summons Lalu Prasad Yadav: मुलगा यशस्वी याच्यासह लालू प्रसाद यादव यांना ईडीकडून नव्याने समन्स; मनी लाँडरिंग प्रकरण)
लालूप्रसाद यांच्यावर धक्कादायक आरोप
खासदार सुभाष यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाना गुरुवारी म्हटले की, लालू प्रसाद यादव यांनी अनेक भ्रष्टाचार आणि अपहरण प्रकरणांमध्ये वाटाघाटी केल्या. हा आरोप करताना त्यांनी राबडी देवी यांच्या नेतृत्त्वाखालील तत्कालीन सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या शंकर प्रसाद टेकरीवाल यांच्या जवळच्या नातेवाईकाशी संबंधित अपहरण प्रकरणाचा संदर्भ दिला. जे सन 2001 मध्ये घडले होते. त्यांनी आरोप केला की लालूंचे विश्वासू सहकारी प्रेमचंद गुप्ता यांनी अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी केल्या.
सुभाष यादव यांनी पुढे असा दावा केला की, सिवानचे माजी खासदार शहाबुद्दीन यांनी तत्कालीन राजद आमदार झाकीर हुसेन खान यांच्यावर टेकरीवाल यांच्या नातेवाईकाची सुटका करण्यासाठी दबाव आणला. झाकीर यांनी मला सांगितले की, त्यांचा अपहरणात कोणताही सहभाग नाही. लालूजींनी मध्यस्थ म्हणून काम केले आणि गुप्तांनी कराराला अंतिम स्वरूप दिले, असे ते पुढे म्हणाले.
सुभाष यादव यांच्या खुलाशांमुळे बिहारमध्ये राजकीय तणाव वाढला आहे. भाजप प्रवक्ते अरविंद सिंह म्हणाले, सर्वांना माहिती आहे की लालू घोटाळ्यांचा राजा होता. सुभाष यांच्या विधानांना वजन आहे कारण ते राबडी देवी यांचे कुटुंबीय होते.
दरम्यान, राजदने आरोपांचे जोरदार खंडन केले आणि त्यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित डावपेच म्हटले. पक्षाचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी दावा केला की, भाजप आणि जद(यू) अशा व्यक्तिरेखेचा वापर करत आहेत जो आधीच लालूंच्या कुटुंबाविरुद्ध आहे. निवडणुकीपूर्वी राजदची प्रतिमा मलिन करण्याचा हा एक हताश प्रयत्न आहे.
दुसरीकडे, जद(यू) नेते अभिषेक झा यांनी आरोपांना दुजोरा देत म्हटले की, हे दावे फक्त एका व्यक्तीने केले नाहीत. लालू-राबडी काळात, संघटित गुन्हेगारीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा पाठिंबा होता.