Bihar: ऐकावे ते नवलंच! चक्क कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी केला ऑनलाइन अर्ज; आधार कार्डसह जोडली सर्व कागदपत्रे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit - Pixabay)

बिहारमध्ये (Bihar) जात प्रमाणपत्रासंबंधी (Caste Certificate) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इथे चक्क कुत्र्याच्या (Dog) जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला आहे. हे प्रकरण बिहारच्या गया जिल्ह्यातील गुरारू ब्लॉकचे आहे. या ठिकाणी जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी परिमंडळ कार्यालयात एक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला, जो चक्क कुत्र्याने केला आहे. महत्वाचे म्हणजे अर्जदाराने अर्जात सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडली आहेत. परंतु हा अनोखा अर्ज विभागाने रद्द केला आहे.

ऑनलाइन अर्जातील अर्जदाराचे नाव टॉमी आहे. टॉमीच्या वडिलांचे नाव शेरू आहे, तर आईचे नाव गिन्नी आहे. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या टॉमीचा पत्ता गाव पांडेपोखर, पंचायत रौना, प्रभाग क्रमांक 13, अंचल गुरारू आणि पोलीस ठाणे कोंच असा नमूद केला आहे.

यामध्ये त्यांनी आपली जात सुतार म्हणून सांगितली आहे व त्यांचा जात अनुक्रमांक 113 आहे. ‘प्रोफेशन’ या कॉलममध्ये अर्जदार ‘विद्यार्थी’ असल्याचे नमूद केले आहे. अर्जदाराची जन्मतारीख 14 एप्रिल 2022 आहे. अर्जासोबत अर्जदाराने आधार कार्डचा फोटोही शेअर केला आहे. आधार क्रमांक 993460458271 आहे. अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता त्यावर राजा बाबूचे नाव दिसत आहे. अर्ज क्रमांक BCCCO/2023/ 314491 असा आहे. (हेही वाचा: Bihar Shocker: ऑपरेशन करण्यास गेलेल्या महिलेच्या दोन्ही किडन्या चोरीला; पतीही गेला सोडून, जाणून घ्या सविस्तर)

विभागाला 24 रोजी हा ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला आहे. असा अजब ऑनलाइन अर्ज पाहून अधिकाऱ्यापासून ते झोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या अर्जाची तपासणी व चौकशी केल्यानंतर तो रद्द करण्यात आला. या आधार कार्ड क्रमांकाची तपासणी केली असता तो बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत ऑफिसर संजीव कुमार त्रिवेदी यांनी आयएएनएसला सांगितले की, कोणीतरी खोडसाळपणा करून असा अर्ज केला असेल. या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत व त्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.