Rape प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur) नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 200 मुलींवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. बिहार आधीच बेरोजगारी आणि स्थलांतराच्या समस्येशी झुंजत आहे. येथे उद्योगांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. अशात काही लोक या समस्येचा गुन्ह्यासाठी एक शस्त्र म्हणून वापर करू लागले आहेत. अहवालानुसार, आरोपींनी एक कंपनी उघडली होती व अहियापूर परिसरात 100 मुलींना नोकरी देण्याच्या नावाखाली ओलीस ठेवण्यात आले होते. त्यांना मारहाण करून लैंगिक अत्याचार केले गेले. या आधी मुझफ्फरपूरमध्ये 34 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली होती.

आता छपरा येथील एक पीडितेने मुझफ्फरपूरमध्ये नोकरीच्या नावाखाली घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. अहवालानुसार, डीव्हीआर नावाच्या कंपनीने फेसबुकवर मुलींसाठी नोकरीची ऑफर पोस्ट केली होती. या पिडीत मुलीने ती जाहिरात पाहिली व संपर्क साधला. तिने अर्ज केल्यानंतर तिची निवड झाली आणि राहणे व जेवण पुरवण्याच्या नावाखाली तिच्याकडे 20 हजार रुपये मागितले गेले.

पहा व्हिडिओ- 

असेच इतर अनेक मुलींना फसवले गेले. पैसे जमा केल्यानंतर या मुलींना अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बखरीजवळ ठेवण्यात आले होते. या ठिकाणी मुलींना फेक कॉल करण्यास शिकवले जात होते. पिडीत मुलीने तक्रारीत पुढे सांगितले की, 3 महिने उलटूनही पगार मिळालेला नसल्याने तिने कंपनीचा सीएमडी तिलक सिंह याच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पीडितेला कंपनीत आणखी 50 मुली जोडण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर तिचा पगार 50,000 रुपये होईल असे आश्वासन देण्यात आले. त्यादरम्यान पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयावर आणि वसतिगृहावर छापे टाकले. त्यावेळी तिलक सिंह पिडीत मुलीला घेऊन हाजीपूरला शिफ्ट झाला आणि तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. (हेही वाचा: Assam Shocker: सिलचरमध्ये आईने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला दारू पाजली, सिगारेट ओढण्यास भाग पाडले; तपास सुरु)

मुझफ्फरपूरमध्ये असतानाही त्याने पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते आणि तिचा गर्भपातही केला होता. मुलीला अनेकवेळा मारहाण करण्यात आली होती. कालांतराने सिंहने पिडीतेला काही पैसे दिले व तिच्याची नाते तोडले. त्यानंतर मुलीने पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेने सांगितले की, अनेक मुलींना ओलीस ठेवले गेले होते आणि त्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी गार्डस तैनात केले होते. या मुलींनी तोंड उघडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. एका मुलीला बेल्टने मारहाण केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.