पुन्हा एकदा बिहार (Bihar) दारू घोटाळ्यामुळे चर्चेत आहे. सिवान जिल्ह्यात बनावट दारू (Siwan Hooch Tragedy) प्यायल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे, परंतु बिहार सरकारमधील एससी/एसटी कल्याण मंत्री संतोष कुमार सुमन यांना 8 लोकांचा मृत्यू ही छोटी गोष्ट वाटत आहे. संतोष सुमन म्हणाले की, ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आधीच सांगितले आहे की दारू ही वाईट गोष्ट आहे, त्यापासून दूर राहण्याची गरज आहे. तरीही लोक दारू पीत आहेत व त्यांचा मृत्यू होत आहे. अशा छोट्या-मोठ्या गोष्टी घडत राहतात.’
ते पुढे म्हणाले की, अशा लोकांना शिक्षा करण्यासाठी सरकार कारवाई करेल आणि करतही आहे. येत्या काही दिवसांत दारूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटना हळूहळू कमी होतील. सिवान दारू मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पुरवठादार आणि वाहतूकदारासह 16 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके अनेक भागात वेगाने छापे टाकत आहेत. सिवानमधील दारू तस्करांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस मुख्यालय या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात अनेकांना अटकही होण्याची शक्यता आहे.
बिहार पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर माहिती शेअर केली आहे. बिहार पोलिसांनी ट्विट केले की, 'घटनेचे गांभीर्य पाहता ही घटना गुन्हे अन्वेषण विभागाने (प्रतिबंध विभाग) घेतली आहे. डीआयजी (सीआयडी), एफएसएल पथकासह घटनास्थळी रवाना झाले आहेत. डीआयजी सरण परिसरात घटनास्थळी तळ ठोकून आहेत. आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.’
सीवान में जहरीली शराब से आठ लोगों की मौत पर बिहार (#Bihar) के अनुसूचित जाति/अनुसूचित जनजाति मंत्री संतोष कुमार सुमन (#SantoshKumarSuman) ने कहा कि इस तरह की 'छोटी-छोटी घटनाएं' हमेशा होती रहती हैं। pic.twitter.com/yjv1kUWatI
— IANS Hindi (@IANSKhabar) January 24, 2023
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, सिवानमध्ये 8 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 12 हून अधिक जणांची प्रकृती खालावली. 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. विषारी दारूमुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यापूर्वी 5 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना सिवान येथील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असताना, अजूनतरी जिल्हा प्रशासनाने त्याला दुजोरा दिलेला नाही. (हेही वाचा: Tamil Nadu चे मंत्री SM Nasar यांना राग अनावर; कार्यकर्त्याने खूर्ची आणायला उशिरा केला म्हणून त्याच्या दिशेने भिरकवला दगड)
दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असूनही लोक येथे दारूचे सेवन करत आहेत. दारूबंदी असतानाही अनेक तस्कर दारूच्या खेपा घेऊन राज्यात पोहोचतात. याआधी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान छपरा जिल्ह्यात सुमारे 70 लोकांचा बनावट दारूच्या सेवनाने मृत्यू झाले होते. आता 41 दिवसांनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.