Bihar Bridge Collapses

Bihar Bridge Collapses: गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar) सतत पूल कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. पावसाळा सुरू होताच दररोज कोणत्या ना कोणत्या शहरात पूल कोसळत आहेत. आता बिहारच्या सिवान जिल्ह्यातून गंडकी नदीवरील (Gandaki River) पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. अहवालानुसार, महाराजगंज उपविभागातील देवरिया पंचायतीच्या पडेन टोलाजवळ गंडकी नदीवर बांधलेला पूल अचानक खचला व कोसळला. त्यानंतर या पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा पूल कोसळल्यामुळे सुमारे डझनभर गावांतील वाहतुकीला समस्या निर्माण झाली आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री एक वाजण्याच्या हा पूल कोसळला, त्यामुळे परिसरात घबराट पसरली. पूल बुडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा गंडकीवर बांधलेला छोटा पूल आहे. गंडकी नदीवर बांधलेल्या या पुलाचा शेवटचा टप्पा आज पहाटे कोसळला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहा व्हिडिओ- 

गेल्या 15 दिवसांत राज्यातील अशा प्रकारची सातवी घटना आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार हा पूल 1982-83 मध्ये बांधण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मुसळधार पावसामुळे गंडकी नदी दुथडी भरून वाहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत जोरदार प्रवाहामुळे पुलाचा काही भाग जमिनीत दबला. देवरिया आणि भिका धरण गावांच्या सीमेवर असलेला हा पूल आधीच अतिशय जीर्ण अवस्थेत होता. (हेही वाचा: Assam Floods: आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 11.5 लाखांहून अधिक लोक बाधित, नागावमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट)

या पुलाच्या दुरवस्थेबाबत अनेकवेळा प्रशासनाला माहिती दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. साधारण 10 दिवसांपूर्वी महाराजगंज उपविभागातच येथून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरौली गावाजवळ गंडकी नदीवर बांधलेला पूल कोसळला होता. अलीकडेच मधुबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अशाच घटनांची नोंद झाली आहे, ज्याने बिहार सरकारला या घटनांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यास प्रवृत्त केले.