Bihar Assembly Election: बिहार दौऱ्यावर असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत, कंगना रनौत, नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी दिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या ही 10 लाखांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरस संकट पाहता या संकटाशी लढण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्यासोबत लढत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कंगनाशी नव्हे तर कोरोनाशी लढणे आवश्यक असल्याचा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election) प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे फडणवीस हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरुनही भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, सुशांत सिंह राजपूत हा भाजपच्या राजकारणाचा मुद्दा नाही. ज्या कलाकाराने देशभर नाव कमावले. त्याचा असा अचानक मृत्यू हे संशय निर्माण करणारे आहे. त्याचा तपास व्हावा इतकीच आमची इच्छा आहे.देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. भाजपने त्यांचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. (हेही वाचा, NCP MLA Rohit Pawar On Opposition: पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं- रोहित पवार)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 बाबत विचारले असता बिहारची जनता भारतीय जतना पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना साथ देईन. जनतेचा विरोधकांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत मोठे यश मिळेल असे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रचार कसा करणार याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी सांगितले की, सोशल डिस्टन्सींग पाळत आम्ही प्रचार करु. तसेच सोशल डिस्टन्सींग पाळून प्रचार करण्यास सुरुवातही केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Former Union Minister Raghuvansh Prasad Singh Passes Away: माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांचे AIIMS रुग्णालयात निधन)

दरम्यान, मुंबईमध्ये माजी नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणे हे चुकीचे आहे. राज्य सरकारने गुंडाराज त्वरीत थांबवावे असेही फडणवीस या वेळी म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, "जे झाले ते अतिशय चुकीचे आहे. हा एक प्रकारचा राज्य सरकार पुरस्कृत दहशत आहे. काल मी माझ्या ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा गुंडा राज थांबवावा अशी विनंती केली आहे. या प्रकरणात प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे सहा जणांना अटक करण्यात आली पण लगेच त्यांची सुटकाही करण्यात आली, महाराष्ट्राने या आधी कधीही अशी स्थिती पाहिली नसल्याचेही फडणवीस या वेळी म्हणाले.