Bharat Bandh: शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण,  संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भारत बंदची हाक
भारत बंद (Photo Credits-ANI)

Bharat Bandh: केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आज चार महिने पूर्ण झाले आहेत. तर चार महिने पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या संगठनांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदमुळे देशातील काही ठिकाणची वाहतूक आणि रेल्वे सेवेवर परिणाम होऊ शकतो. भारत बंदचा परिणाम बाजारांमध्ये सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या मते भारत बंदची हाक सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. ही बंदची हाक शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याने दिली गेली आहे.

शेतकरी मोर्चाचे नेते दर्शनपाल यांनी एका व्हिडिओत असे म्हटले की, बंदच्या दरम्यान भाज्या आणि दूध यांचा पुरवठा रोखला जाणार आहे. मोर्चाने एका विधानात म्हटले की, संपूर्ण भारत बंदच्या काळात सर्व दुकाने, मॉल्स, बाजार आणि संस्था बंद राहणार आहेत. सर्व रस्ते जाम केले जाणार असून ट्रेन चालवण्यावर सुद्धा बंदी घातली जाणार आहे. मात्र रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. दिल्लीतच भारत बंदचा अधिक प्रभाव दिसून येणार आहे.(Bank Holidays in April 2021: एप्रिलमध्ये बँका 12 दिवस बंद राहणार, केवळ 18 दिवस चालणार कामकाज; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी)

किसान मोर्चाने अपील केले आहे की, भारत बंदच्या वेळी सर्व आंदोलक शेतकऱ्यांनी शांतता राखावी आणि कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. दुसऱ्या बाजूला देशातील आठ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्वचा दावा करणारी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या भारत बंदच्या हाकेमध्ये सहभागी होणार नाही आहे.